​अहिल्यानगर जिल्हापरिषदेच्या माजी सभापती मीराताई चकोर यांचे निधन

संगमनेर Live
0
​अहिल्यानगर जिल्हापरिषदेच्या माजी सभापती मीराताई चकोर यांचे निधन

◻️ ​पिंपळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माजी सभापती आणि संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या सौ. मीराताई भीमाशंकर चकोर (वय ५८) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री ७:३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक व राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

​स्वर्गीय हरिभाऊ सांगळे यांच्या कन्या असलेल्या मीराताईंना घरातूनच समाजकारण व राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. हा वारसा त्यांनी पुढे अत्यंत निष्ठेने चालवला. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती म्हणून त्यांनी तळागाळातील उपेक्षित घटकांसाठी अत्यंत प्रभावी काम केले. संगमनेर तालुका पंचायत समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. काॅग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात महिलांचे मोठे संघटन उभे केले आणि महिलांच्या हक्कांसाठी सतत पुढाकार घेतला.

​गेल्या काही दिवसांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती बी. आर. चकोर आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पिंपळे येथे नातेवाईक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

​मीराताई चकोर यांच्या निधनाचे वृत्त समजताच काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह निमोण, नान्नज दुमाला तसेच संगमनेर व राहाता तालुक्यातील विविध गावांमधील राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकारी व नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !