महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट; राज्यात ‘ट्रिगर-१’ लागू

संगमनेर Live
0
महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट; राज्यात ‘ट्रिगर-१’ लागू


◻️ मुख्यमंत्र्यांचे प्रत्यक्ष पाहणीचे आदेश; दुष्काळ जाहीर होण्याची दाट शक्यता!


संगमनेर LIVE (​मुंबई) | यंदा मान्सूनने ओढ दिल्याने महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट ओढवले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत खरीप पिकांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या गंभीर संकटाची दखल घेत राज्य प्रशासनाने अखेर दुष्काळाचा ‘ट्रिगर-१' लागू केल्याची माहिती समोर येत आहे. विरोधकांकडून संपूर्ण राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत असतानाच, शासनस्तरावरही तातडीने उपाययोजना आणि मदतकार्याला गती देण्यात येत आहे.

​राज्यात ऐन वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन आणि कापसासारखी महत्त्वाची पिके शेतातच पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर नगदी पीक मानल्या जाणाऱ्या ऊसाचेही मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने लागवडीचा खर्चही निघण्याची शक्यता उरलेली नाही. या गंभीर स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना तातडीने दुष्काळग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महसूल, कृषी आणि जलसंपदा या तिन्ही विभागांनी संयुक्तपणे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याची चाचपणी युद्धपातळीवर सुरू केली आहे.

​परिस्थितीचे गांभीर्य मांडताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असा भीषण दुष्काळ कधीही पाहिलेला नाही. शेतांमध्ये कोणतीही पिके शिल्लक उरलेली नाहीत; सोयाबीन आणि कापूस संपूर्ण नष्ट झाला असून ऊसाचे ही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ १०० टक्के जाहीर होण्याची स्पष्ट परिस्थिती निर्माण झाली असून शासन 'एनडीआरएफ'च्या नियमांनुसार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यास कटिबध्द आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पालकमंत्र्यांचे प्रत्यक्ष पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत अधिकृत दुष्काळ घोषणा आणि विशेष मदत पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !