“संतांचा विचार आणि संगमनेरचा विकास हीच आमची प्राथमिकता!”
◻️ आमदार अमोल खताळ यांनी दिल्या तालुक्यातील अखंड हरिनाम सप्ताहांना भेटी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला एकत्र बांधण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्रातील संत-महंतांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही याच संस्कृती व धर्माच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले. संतांनी दिलेला हा समृध्द सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपत तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. अध्यात्मासोबतच गावगाड्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, मालुंजे जाखुरी, देवगाव आणि रायतेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहांना सदिच्छा भेटी दिल्या. याप्रसंगी कीर्तन व भजन श्रवण करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
उपस्थितांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, “संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्यासह अनेक संतांनी महाराष्ट्राला मानवतेची शिकवण दिली. माणसा-माणसात परमेश्वर शोधणे आणि निस्वार्थ भावनेने मानवाची सेवा करणे हीच खरी विठ्ठलभक्ती आहे.
अखंड हरिनाम सप्ताहासारख्या उपक्रमांमुळे गावागावांत धर्म आणि अध्यात्माची जागृती होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या सप्ताहाची आतुरतेने वाट पाहतात. या धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे गावातील वातावरण भक्तिमय व पवित्र बनते आणि समाजातील सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो.” असेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील मूलभूत समस्या आणि नियोजित विकासकामांचा आढावा घेताना आमदार खताळ पुढे म्हणाले की, “ग्रामीण भागातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कृषि फिडरचे विभक्तीकरण करून ‘सिंगल फेज’ जोडणीद्वारे वाड्या-वस्त्यांना २४ तास वीज देण्याचे नियोजन सुरू असून, संगमनेर खुर्द येथून या कामाचा शुभारंभ झाला आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा कायमचा उतरविण्याचा आपला ठाम संकल्प आहे. तसेच ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळावा आणि स्थानिक उद्योजकतेला चालना मिळावी, यासाठी कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारणीचे काम वेगाने पुढे नेले जात आहे. याव्यतिरिक्त महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात १०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाला लवकरच मंजुरी मिळणार आहे.” असे देखील सांगितले.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जाखुरी येथील सभामंडपाच्या कामासाठी आमदार अमोल खताळ यांनी २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. पहिल्या टप्प्यात १० लाख आणि त्यानंतर आणखी १० लाख रुपये दिले जाणार असून, पुढच्या वर्षीच्या हरिनाम सप्ताहापूर्वी हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रायतेवाडी येथील सभामंडपासाठी आमदार निधीतून १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. मालुंजे, चिंचोली गुरव, जाखुरी, देवगाव, रायतेवाडीसह तालुक्यातील कोणत्याही गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.