अहिल्यानगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे रूप पालटणार!

संगमनेर Live
0
अहिल्यानगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे रूप पालटणार!

◻️​ डॉ. सुजय विखे पाटलांकडून संवर्धन आणि विकास आराखड्याची पाहणी


संगमनेर LIVE (अहिल्यानगर ) | अहिल्यानगर शहराच्या इतिहासाचा आणि अस्मितेचा महत्त्वाचा ठेवा असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला लवकरच गतवैभव प्राप्त होणार आहे. किल्ल्याचे संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या पार्श्‍वभूमीवर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतीच किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मंजूर आराखड्यानुसार प्रत्यक्षात जागेवर काय बदल होणार आहेत, याचा सविस्तर आढावा घेतला. आश्‍वी

​या पाहणी दौऱ्यात डॉ. विखे पाटील यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांसोबत किल्ल्याच्या विविध भागांची पाहणी केली. प्रस्तावित विकासकामांची रचना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि पर्यटकांसाठी निर्माण केल्या जाणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. आराखड्यातील कामांची प्रत्यक्ष जागेशी सांगड घालत, ज्या ठिकाणी बदल किंवा सुधारणांची आवश्यकता आहे, तिथे त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. "कोणताही विकास करताना किल्ल्याचे मूळ स्वरूप आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहिले पाहिजे," यावर त्यांनी विशेष भर दिला.

भुईकोट किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाल्यानंतर लष्करी प्रशासनासोबत झालेला सामंजस्य करार (एमओयू) हा या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे हा करार मार्गी लागला. यामुळेच आता विकासकामांच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला गती मिळाली आहे.

या संवर्धन प्रकल्पांतर्गत किल्ल्याशी संबंधित ऐतिहासिक वास्तू आणि स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींचे जतन करून त्या नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचे नियोजन आहे. विशेषतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिलेला ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ (भारताचा शोध) हा ग्रंथ आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वास्तव्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भांना या माध्यमातून उजाळा दिला जाणार आहे.

दरम्यान, ​या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करून अहिल्यानगरला पर्यटनाच्या नकाशावर एक नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या पाहणी दौऱ्यावेळी विविध विभागांचे संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !