घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगचा ४५ दिवसांचा नियम रद्द!

संगमनेर Live
0
घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगचा ४५ दिवसांचा नियम रद्द!

◻️ जनतेला आता २५ दिवसांतच मिळणार घरगुती एलपीजी सिलिंडर!




संगमनेर LIVE (​नवी दिल्ली) | ग्रामीण भागातील कोट्यवधी घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने अत्यंत दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. आता ग्रामीण भागातील ग्राहकांनाही अवघ्या २५ दिवसांच्या अंतराने घरगुती सिलिंडरचे रिफिल बुकिंग करता येणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी ग्रामीण भागासाठी लागू केलेली ४५ दिवसांच्या अंतराची सक्ती पूर्णपणे मागे घेतली असून, आता शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी सिलिंडर बुकिंगचा कालावधी एकसमान म्हणजेच २५ दिवस निश्चित करण्यात आला आहे.

​केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. तसेच, या बदलाची देशभरात तत्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व ऑइल मार्केटिंग कंपन्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील घरगुती गॅस वितरण नियमांमध्ये सुसूत्रता आली असून ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन आणि एलपीजी पुरवठा साखळीवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. देशांतर्गत वाढत्या मागणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गॅसचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारने मार्च २०२६ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात रिफिल बुकिंगवर निर्बंध लादले होते. 

यानुसार ९ मार्च रोजी शहरी भागासाठी रिफिल बुकिंगचे अंतर २५ दिवस करण्यात आले होते, तर १२ मार्च रोजी ग्रामीण भागासाठी हे अंतर थेट ४५ दिवस करण्यात आले. मात्र, सिलिंडर संपल्यानंतर दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्रामीण भागातील कुटुंबांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

​सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याची परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आली असून पुरवठा साखळी सुरळीत झाली आहे. तेल कंपन्यांकडील प्रलंबित बुकिंगची संख्या लक्षणीयरीत्या घटल्यामुळे वितरणातील अडथळे संपुष्टात आले आहेत.

दरम्यान, बाजारातील स्थैर्य आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य गृहिणींची अडचण लक्षात घेऊन सरकारने हे निर्बंध हटवले असून, आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागालाही २५ दिवसांत गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !