घुलेवाडी येथील श्री कान्होबा देवस्थानच्या जागेचा निकाल देवस्थानच्या बाजूने!

संगमनेर Live
0
घुलेवाडी येथील श्री कान्होबा देवस्थानच्या जागेचा निकाल देवस्थानच्या बाजूने!

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री कान्होबा देवस्थानच्या जागेवरील मालकी हक्काचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर देवस्थानच्या बाजूने लागला आहे. संगमनेरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, देवस्थानच्या जागेवर आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते श्री कान्होबा देवाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाविकांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. या निर्णयामुळे घुलेवाडी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

​श्री कान्होबा देवस्थानच्या जागेवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी घुलेवाडीचे ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून संयमाने आणि कायदेशीर मार्गाने लढा देत होते. ग्रामस्थांच्या या न्याय्य हक्कासाठी आमदार अमोल खताळ यांनी थेट विधानसभेत आवाज उठवून हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि ग्रामस्थांच्या प्रदीर्घ लढ्याला आता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निकालाने मोठे यश मिळाले आहे.

​निकाल देवस्थानच्या बाजूने लागताच, ग्रामस्थांच्या उपस्थितीत जागेवर श्री कान्होबा देवाच्या नावाचा फलक उभारण्यात आला. या संपूर्ण लढ्यात सातत्याने प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे ग्रामस्थांनी जाहीर आभार मानले.

​“श्री कान्होबा देवस्थान ही घुलेवाडी ग्रामस्थांच्या श्रध्देची आणि आस्थेची जागा आहे. या जागेवरील हक्कासाठी ग्रामस्थांनी अनेक वर्षे कायदेशीर लढा दिला, ज्याला अखेर यश आले आहे. आता सातबारा उतारा श्री कान्होबा देवस्थानच्या नावावर असल्याने, या जागेवर इतर कोणीही अधिकार गाजवणे किंवा हस्तक्षेप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. यापुढील काळात या जागेतील पिकाची नोंदही श्री कान्होबा देवस्थानच्या नावानेच झाली पाहिजे. या जागेवर केवळ आणि केवळ कान्होबा देवस्थान आणि घुलेवाडी ग्रामस्थांचाच अधिकार असून, याबाबत कोणीही विनाकारण चुकीचे गैरसमज पसरवू नयेत.” असे आमदार अमोल खताळ यावेळी म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !