नाना पाटेकर आणि बी. आर. कदम यांना संगमनेरकरांची आदरांजली!
◻️शोकसभेत कार्य आणि आठवणींना उजाळा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | अभिनय क्षेत्रासोबतच समाजाशी घट्ट नाळ जोडून शेतकरी व दुष्काळग्रस्तांसाठी झटणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि उपेक्षितांच्या दारात ज्ञानाची गंगा पोहोचवणारे बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष बी. आर. कदम यांना संगमनेर येथे आयोजित शोकसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. रविवारी (दि. ११) विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रंगकर्मी संगमनेर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अखिल भारतीय नाट्य परिषद (शाखा संगमनेर), अखिल भारतीय चित्रपट महामंडळ (शाखा संगमनेर), शांती फाउंडेशन आणि लिनियर फिल्म्स यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी संगमनेर परिसरातील चित्रपट, नाट्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दोन्ही दिवंगत व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतींना उजाळा दिला.
शोकसभेत बोलताना वक्त्यांनी नाना पाटेकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला. अभिनयाच्या शिखरावर असतानाही नानांनी समाजातील शेवटच्या घटकाची चिंता वाहिली. स्वतःचे आर्थिक योगदान देत त्यांनी संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार दिला. विशेषतः दुष्काळी भागातील जलसंधारण आणि पाणलोटाच्या कामात त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील दीपस्तंभ ठरले आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दुसऱ्या बाजूला बी. आर. कदम यांनी बहुजन शिक्षण संघाच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित आणि उपेक्षित घटकांतील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक पिढ्यांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता आली, अशा आठवणी सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले. कला आणि शिक्षण या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत असले, तरी नाना पाटेकर आणि बी. आर. कदम यांच्यात ‘माणुसकी आणि समाजऋण फेडण्याची तळमळ’ हा एकच समान धागा होता, यावर सर्व वक्त्यांचे एकमत झाले.
या श्रध्दांजली सभेत हिरालाल पगडाल, डॉ. नामदेवराव गुंजाळ, ॲड. निशांत देशमुख, प्रा. संजय दळवी, डॉ. सोमनाथ मुटकुळे, प्रा. प्रकाश पारखे, वसंत बंदावणे, राजाभाऊ अवसक, श्री. भोईर, माऊली वर्पे, श्री. विठ्ठल, सूर्यकांत शिंदे यांच्यासह कला, साहित्य आणि समाजकारणातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि शेवटी आभार प्रदर्शन रंगकर्मी अंतून घोडके यांनी केले. तर, दोन्ही व्यक्तींनी घालून दिलेला विचारांचा वारसा कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा निर्धार व्यक्त करून शोकसभेची सांगता झाली.