राजकारण निवडणुकीपुरतेच, आता फक्त विकास - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
राजकारण निवडणुकीपुरतेच, आता फक्त विकास - आमदार अमोल खताळ 

◻️ ​सोनेवाडीत विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

◻️ विद्यार्थ्यांसाठी वाचनालय अन् अभ्यासिका सुरू करण्याचा दिला शब्द




​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित ठेवून इतर वेळी सर्वपक्षीय मतभेद विसरून जनतेच्या विकासासाठी काम करायचे असते. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणे, मूलभूत प्रश्न सोडवणे आणि तरुणांच्या हाताला काम देणे हीच माझी पहिली प्राथमिकता आहे. सोनेवाडी ग्रामस्थांनी जागेची उपलब्धता करून दिल्यास वर्षभराच्या आत सुसज्ज वाचनालय आणि विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका सुरू करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही,” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

​संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे सुमारे १ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार खताळ यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. ​या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप नेते भीमराज चत्तर, संदीप देशमुख, राजेंद्र सोनवणे, श्रीकांत गोमासे, हरीशचंद्र चकोर, संपत फड, पांडुरंग गोमासे, राहुल गोमासे, सुधीर घुगे, सुवर्णा सांगळे, गणेश सानप, गोरख गाडेकर, अमोल अंधाळे, रणजित जाधव, योगेश डोंगरे, आकाश सानप यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सोनेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​पूर्वीच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवत आमदार खताळ म्हणाले, “पूर्वी दुष्काळात केवळ टॅकरचे पाणी आणून पूजन करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा तोच पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहायचा. मात्र, आमदार झाल्यानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून चारीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवला व तळेगावच्या माथ्यापर्यंत पाणी पोहोचवले. आता भोजापूर चारीच्या कामासाठी ४५ कोटींचा भरीव निधी मंजूर झाला आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या चारीच्या रुंदीकरणासाठी मुंबईत जलसंपदामंत्र्यांसमवेत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढला जाईल. केवळ भोजापूर धरण ओव्हरफ्लो होण्याची वाट न पाहता, निमोण-तळेगाव परिसराचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नदीजोड प्रकल्पात या भागाचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” असे त्यांनी स्पष्ट केले.

​स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी औद्योगिक विकासावर भर दिला जात असल्याचे सांगत आमदार खताळ म्हणाले, “कवठे मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या (एमआयडीसी) प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या उद्योगांबरोबरच लघुउद्योग व पूरक व्यवसायांची मोठी साखळी तयार होईल. स्थानिक तरुणांनी स्वतः उद्योजक बनून इतरांच्या हाताला काम द्यावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.” असे देखील नमूद केले.

​“दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी शिलाई मशीन वाटपाचा विशेष उपक्रम हाती घेण्यात येत आहे. याशिवाय, महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लघुउद्योग व स्वयंरोजगाराचे सक्षम जाळे निर्माण करण्यासाठी ठोस पाऊले उचलली जातील.” असे आश्‍वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !