संगमनेरची एमआयडीसी कौठे मलकापूर येथेच होणार - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
संगमनेरची एमआयडीसी कौठे मलकापूर येथेच होणार - आमदार अमोल खताळ 

​◻️ एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेची वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “संगमनेर तालुक्यातील जनतेने विश्‍वास दाखवून मला काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी दिवस-रात्र कटिबध्द आहे. मात्र, ‘एमआयडीसी घारगावला होणार, बोटा येथे होणार’ अशा वावड्या उठवून काही जण निव्वळ स्टंटबाजी करत आहेत. विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरी संगमनेर तालुक्याची एमआयडीसी कौठे मलकापूर येथेच होणार,” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

​संगमनेर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती यावी, यासाठी कौठे मलकापूर येथे एमआयडीसी उभारणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.

​या पाहणी दौऱ्यावेळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) उपमुख्य कार्यकारी अधिकारी शंकर बर्गे, अहिल्यानगरचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोतवाड, उप-रचनाकार सुहास लाहोटी, सहायक अभियंता राहुल बळी, प्रमुख भूमापक फुलचंद कातकडे, एकनाथ ठाकरे तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व पठार भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले, “संगमनेरमध्ये औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी संगमनेरच्या सभेत एमआयडीसीचा दिलेला शब्द पूर्ण होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनीही या प्रकल्पासाठी स्वखुशीने जमीन देण्याची तयारी दर्शवली असल्याने जागेचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला आहे.”

​विरोधकांवर टीका करताना आमदार खताळ म्हणाले, “गेल्या चाळीस वर्षांत ज्यांना औद्योगिक वसाहत आणता आली नाही, ते काम एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने अवघ्या दीड वर्षात मार्गी लावले. याचे शल्य विरोधकांच्या मनात आहे. जनतेने तुम्हाला नाकारून घरी बसवले आहे, त्यामुळे आता सुरू असलेल्या विकासकामांत अडथळे आणू नका. जनतेच्या हिताच्या कामांना विरोध केल्यास जनताच तुम्हाला योग्य उत्तर देईल.” या प्रस्तावित एमआयडीसीमध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शवली असून, स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

​“कौठे मलकापूर येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी आवश्यक पाण्याचा कोटा राखीव ठेवण्याचा शब्द जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे पाण्याचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही. सर्व प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत या औद्योगिक वसाहतीचे भूमिपूजन व उद्घाटन केले जाईल.” असे देखील आमदार अमोल खताळ यांनी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !