संगमनेर तालुक्यातील रेशन दुकानांवर दिव्यांगांना मिळणार प्राधान्य!
◻️आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पुरवठा विभागाला सूचना
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेताना रांगेत उभे राहण्याचा शारीरिक त्रास सहन करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन दिव्यांग व्यक्तींना रेशन वितरणात प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी ‘दिव्यांग सारथी संघटने'च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली.
या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार खताळ यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांबाहेर दिव्यांगांना प्राधान्य देण्याबाबतचे फलक लावण्याच्या सक्त सूचना दिल्या.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य घेताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदारांची भेट घेऊन ही व्यथा मांडली होती. आमदारांनी विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश दिले. प्रत्येक दुकानाबाहेर दिव्यांगांना प्राधान्याने धान्य दिले जाईल, असे स्पष्ट करणारे फलक लावण्याचे निर्देश दिल्याने दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
दरम्यान, आमदार खताळ यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल दिव्यांग सारथी संघटनेचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधवांनी त्यांचे आभार मानत निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेकडो दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेशनच्या प्रश्नासोबतच दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने इतरही महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन आमदार अमोल खताळ यांना देण्यात आले. राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना सध्या मिळणारे अडीच हजार रुपयांचे अनुदान वाढवून ते प्रतिमहिना ६ हजार रुपये करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, शासनाच्या विविध योजनांची माहिती, आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, यासाठी संगमनेरमध्ये ‘दिव्यांग भवन’ तातडीने सुरू करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.