संविधान टिकवण्यासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या गरज - बाळासाहेब थोरात
◻️ ठाण्यात काॅग्रेसची संविधान बचाव रॅली; भाजप सरकारच्या धोरणावर कॉग्रेसचा हल्लाबोल
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “देशाला मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. या संविधानामध्ये साधुसंतांचे विचार, समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाची मूल्ये आहेत. मात्र, आज याच संविधानावर आणि लोकशाही व्यवस्थेवर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाचे रक्षण करण्यासाठी काॅग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून, देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून संघर्ष उभा करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिनानिमित्त ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या 'संविधान बचाव रॅली'त ते बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली, तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना संविधान रक्षणाची शपथ दिली.
पुढे बोलताना थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “भाजप सरकारकडून संविधानाची मूल्ये आणि लोकशाही मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. आज देशात मतांची चोरी करून जनतेच्या कौलावर उभे राहिलेले सरकार चोरले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मतदानाचा अधिकार सुरक्षित राहिला नाही, तर लोकशाहीचा पाया कमकुवत होईल. त्यामुळे संविधान वाचवण्याची जबाबदारी केवळ एका पक्षाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे.”
यावेळी महाराष्ट्र काॅग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी मोदी-शाह सरकार सर्वसामान्यांचे अधिकार हिरावून घेत असल्याचा आरोप करत ‘संविधान वाचले तरच देश वाचेल’, असा इशारा दिला.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ भाजपवर टीका करताना म्हटले की, “मनुस्मृती आणि 'बंच ऑफ थॉट्स'ला महत्त्व देणाऱ्या भाजपाला आज संविधानाचा पुळका येणे म्हणजे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ असून त्यांना आंबेडकरांचे संविधान रद्द करून मनुस्मृती आणायची आहे.”
तर विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी, लोकशाहीची हत्या ठाण्यातूनच झाल्याची जाणीव ठेवून ही रॅली आयोजित केल्याचे स्पष्ट केले. मतदानात गैरप्रकार करून भाजपने गोकुळमधील सत्ताही चोरल्याचा आरोप करत शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी संविधानाचे रक्षण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच माजी मंत्री नसीम खान यांनीही भाजप सरकारकडून लोकशाहीची पायमल्ली होत असल्याचे सांगून काॅग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधान रक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.
या रॅलीत खासदार चंद्रकांत हंडोरे, शोभा बच्छाव, प्रणिती शिंदे, रवींद्र चव्हाण, शिवाजी काळगे, आमदार भाई जगताप, माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, रमेश बागवे, महिला काॅग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सुनीता गावंडे, मुजफ्फर हुसेन, चरणसिंग सप्रा, मोहन जोशी, ॲड. गणेश पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांच्यासह काॅग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.