दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अहिल्यानगर जिल्हा बॅकेचा १ कोटींचा निधी
◻️ डॉ. विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने आपल्या पहिल्याच बैठकीत सामाजिक बांधिलकी जपत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बॅकेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह सर्व संचालकांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. या मदतकार्यात बॅकेच्या निधीसोबतच बॅकेचे कर्मचारीही आपल्या एक दिवसाचे वेतन देऊन सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.
मदतीचा हा निर्णय घेताना बॅकेचे आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक शिस्त अबाधित राहील, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. “बॅकेची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन, शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” अशी भूमिका अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संचालक मंडळाने यावेळी मांडली.
दरम्यान, दुष्काळी संकटाच्या काळात धावून जाण्याची अहिल्यानगर जिल्हा बॅकेची जुनी परंपरा नव्या संचालक मंडळानेही कायम ठेवली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन हा १ कोटी रुपयांचा निधी त्यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात येणार आहे
.