◻दैव बलवत्तर, काद्यांचे पिकअप वाहन आल्याने वाचला जीव.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील खळी येथिल सूर्यभान गणपत उगलमुगले (वय - ५७) हे मंगळवारी सायंकाळी बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले असून सदर बिबट्या वनविभागाने जेरबंद करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सूर्यभान उगलमुगले हे मंगळवारी झरेकाठी येथे घरगुती किराणा बाजार करून आपल्या घराकडे दुचाकीवरुन चालले होते. यावेळी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दाढ - झरेकाठी रस्त्यालगत असलेल्या पाच मोरी येथे शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने उगलमुगले यांच्या दुचाकीवर हल्ला केला. त्यामुळे उगलमुगले खाली कोसळले. यावेळी बिबट्याने त्याच्याकडे मोर्चा वळवत त्याच्या पायाला चावा घेऊन गंभीर दुखापत करण्याच्या हेतुने पुढे सरसावला असता उगलमुगले यांच्या सुदैवाने मागून काद्यांचे पिकअप वाहन आले. त्याचा उजेड बिबट्यावर पडला व आवाज झाल्याने बिबट्याने तेथून झुडपात पलायन केले. यावेळी नागरीकानी उगलमुगले यांना आश्वी खुर्द येथिल प्राथमिक आरोग्य केद्रांत उपचारासाठी दाखल करत प्राथमिक उपचारानतंर घरी नेले आहे.
दरम्यान या परिसरात असलेल्या लपण क्षेत्रामुळे वारंवार या पिरीसरात बिबट्याचे हल्ले वाढत असून ही मागील काही महिन्यातील पाचवी घटना आहे. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी वनविभागाने पिजंरा लावून हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी राजहंस दूध संघाचे संचालक राजेद्रं चकोर, तालुका कॉग्रेसच्या एससी विभागाचे अध्यक्ष सतीष वाघमारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग वाघमारे, सुरेश नागरे, प्रा. बाळासाहेब वाघमारे आदिसह स्थानिक ग्रामस्थं व शेतकऱ्यांनी केली आहे.