◻ ऊर्जामंत्र्यांकडून दखल ; अवघ्या २४ तासात बदलले रोहीत्र.
संगमनेर Live | ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या मोबाईलवर व्हॉट्स ॲपद्वारे संगमनेर तालुक्यातील शेतकरी संजय नागरे यांनी केलेल्या रोहीत्र नादुरस्त असल्याची तक्रांरीचे ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी यानी तातडीने दखल घेऊन केवळ २४ तासात नवीन रोहीत्र बसवून शिबलापूर येथिल गावकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
संगमनेर विभागाच्या आश्वी शाखे अंतर्गत येणाऱ्या शिबलापूर गावातील रोहीत्र तांत्रिक बिघाडामुळे दि. २७ सप्टेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास नादुरस्त पडले. रब्बी हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना विजेची फार आवश्यकता भासत असून रोहीत्र नादुरस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याची जाणीव गावातील शेतकरी संजय नागरे यांच्या लक्षात आली. नागरे यांनी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या मोबाईलवर रोहीत्र नादुरस्त झाल्याची तक्रार व्हॉट्स ॲपद्वारे पाठवली.
रोहीत्र नादुरस्त झाल्याची तक्रारीबाबत ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधून गावातील रोहीत्र २४ तासांच्या आत बदलून देण्यात यावे असे आदेश दिले.
रोहीत्र दुरूस्तीचे केंद्र असलेल्या बाभळेश्वर येथून उपलब्ध असलेले रोहीत्र घेऊन शिबलापूर येथे बसविण्यात आले. रोहीत्र बसविल्यानंतर सर्व तांत्रिक चाचण्या पार पाडून हे रोहीत्र दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सुरू करून गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. एका दिवसात रोहीत्र बदलून देण्यात आल्याबद्दल शिबलापूर ग्रामस्थानी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आभार मानून राज्याला सक्षम ऊर्जामंत्री मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.