◻ रोख रक्कमेसह सोने व चांदीचे दागिने घेऊन चोरटा पसार ; गुन्हा दाखल.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी आजमपूर येथे १४ ऑक्टोबर रोजी पहाटे भिकाजी भिमाजी फणसे यांच्या राहत्या घरातून सुमारे ७६ हजार ३०० रुपये किमंतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केल्याची घटना घडली असून आश्वी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात भिकाजी भिमाजी फणसे यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, पिप्रीं - लौकी आजमपूर येथे मी कुटुंबासमवेत राहत असून १३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आम्ही सर्वजन झोपला होतो. आमच्या घरालगत गाई व शेळ्याचा गोठा असून परिसरात बिबट्याची मोठी दहशत आहे. त्यामुळे जनावराची सुरक्षा करता यावी यासाठी घराच्या दरवाजा कडी न लावता फक्त लोटून घेतलेला होता. दि. १४ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता मला जागी आली त्यावेळी लाईट बंद असल्याने मी बाहेर जाऊन पाहिले असता बल्ब कोणीतरी काढून नेला होता. त्यामुळे मी घरात येऊन पहाणी केली असता पेटी गायब दिसली व शोध घेतला असता घरालगत असलेल्या घासाच्या शेतात पेटी सापडली. परंतू त्यातील सोन्याची अंगठी, दोनी पोथी, एक दानी सर, डोरले व ओमपान तसेच चांदीचे जोडवे, मासुळ्या, कडे व रोख रक्कम असा तब्बल ७६ हजार ३०० रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले.
त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर क्रमांक ४१७/२०२० नुसार भादंवी कलम ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस करत आहेत.