कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना.

संगमनेर Live
0
जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या वाढणार.

संगमनेर Live | जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संभाव्य रुग्णांच्या चाचण्या करुन संसर्ग आटोक्यात आणण्याच्या दिशेने यंत्रणा आता गतिमान झाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय सर्व यंत्रणांना आरटीपीसीआर आणि रॅपिड अँँण्टीजेन चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यासाठी आणखी ५० हजार रॅपीट अँँण्टीजेन टेस्ट कीट्स प्राप्त झाले असून चाचण्यांची गती आता वाढणार आहे.
 
जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासन सातत्याने विविध उपाययोजना करीत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाकडे लक्ष दिले जात असतानाच संभाव्य रुग्णांना शोधण्याची मोहिमही गतिमान करण्यात आली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. याशिवाय, जिल्ह्यातील बाधित रुग्णांना आता होम आयसोलेशन बंद करुन कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठीच्या दिशेने पावले पुढे टाकले जात आहेत.
 
सध्या जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे, त्याची एकीकडे प्रभावी अंमलबजावणी होत असतानाही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविण्याचे ठरविले आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यासंदर्भात सातत्याने उपविभागीय अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी ज्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सूचना देत असून तालुकानिहाय प्रत्यक्ष भेटी देत आहेत. तेथील स्थानिक परिस्थिती समजावून घेत उपाययोजनांची दिशा ठरवित आहेत.
 
दररोज प्राथमिक आरोग्य केंद्रावर किमान ५० आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये किमान १५० आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाव्यात. प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू असतानाही विनाकारण घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांची अॅण्टीजेन चाचण्या कराव्यात, त्यात बाधित आढळून आल्यास त्यांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून सर्व संभाव्य रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करावी, लसीकरण मोहिमेवेळी गर्दी होणार नाही यासाठी लसीकरण केंद्रावर पुरेसे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.
 
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या सर्वेक्षणावेळी ज्या व्यक्तींना लक्षणे आढळून येत असतील, त्यांची तातडीने चाचणी करण्याची सूचनाही त्यांनी केली. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. गावपातळीपासून ते महानगरपालिका क्षेत्रापर्यंत सध्या जिल्हा प्रशासनाने बाधित रुग्णांना होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे रुग्णांना त्यांच्या लक्षणानुसार कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्येच दाखल केले जावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !