◻ संगमनेर येथे कोरोना उपायोजना बाबत आढावा बैठक संपन्न.
संगमनेर Live | कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेक जण निष्काळजीपणा करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढ झाली. प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून मास्क वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक गाव कोरोना मुक्त करण्यासाठी आगामी काळात काळजीपूर्वक काम करा याबाबद कोणीही निष्काळजीपणा करु नका तसेच या कोरोनाच्या लढाईत संपूर्ण तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय नागरिकांनी शिथिलता येवू नका. असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोरोना उपाययोजना आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. राजकुमार जर्हाड, डॉ. सुरेश घोलप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडूरंग पवार, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.
यावेळी नामदार थोरात म्हणाले की, कोरोना संपलेला नसून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या जात असून त्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. तालुक्यात सध्या ५० गावे कोरोनामुक्त झाली आहे. मात्र आपल्याला प्रत्येक गाव व संपूर्ण तालुका कोरोणा मुक्त करावयाचा आहे. यासाठी प्रत्येक गावातील ग्राम रक्षक सुरक्षा समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करताना कोणतीही लक्षणे आढळल्याचे तातडीने विलगीकरण करा. तपासणी, विलगीकरण व तातडीचे उपचार हा कोरोना मुक्तीचा मार्ग आहे. मात्र यामध्ये सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. घरगुती समारंभ सुरु करु नका. गर्दी केल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढू शकतो. म्हणून कोरोनाशी लढतांना कोणतीही शिथिलता येवू देऊ नका असे ते यावेळी म्हणाले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, कोरोनाचा स्ट्रेंथ हा दिवसेंदिवस बदलत आहे. नवा आजार हा अत्यंत घातक आहे. मात्र डबल मास्कचा वापर केल्याने आपण कोरोनापासून काही प्रमाणात आपण स्वत:चा बचाव करू शकतो. सर्वांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणास प्राधान्य देवून कोरोना दुर होवू शकतो. मात्र या काळात प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. असे ही ते यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी प्रातांधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी गावनिहाय माहिती दिली.