तालुकास्तरावर ऑक्सीजनचा पुरेसा साठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करा - जिल्हाधिकारी

संगमनेर Live
0
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु.

संगमनेर Live (अहमदनगर) | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासंदर्भात जे नियोजन केले जात आहे. ते मूर्त स्वरुपात येण्यासाठी तालुकास्तरावर सर्व यंत्रणांनी तेथील खाजगी हॉस्पिटल्स तसेच स्थानिक इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन संबंधित ठिकाणी पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होईल यासाठीची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिल्या.
 
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.
 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन संभाव्य लाटेच्या अनुषंगाने आवश्यक ऑक्सीजनसाठी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. जी हॉस्पिटल्स ५० पेक्षा जास्त बेडस क्षमतेची आहे, त्यांनी त्यांना आवश्यक असणारा ऑक्सीजन साठवण्यासाठीची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. त्यासाठी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी, जम्बो सिलींडर, ड्युरा सिलींडरची व्यवस्था आदींची सुविधा करणे आवश्यक आहे. 

त्याचबरोबर ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांबरोबर करार करुन घेणे आवश्यक आहे. तालुका पातळीवर ही कार्यवाही वेगाने होणे अपेक्षित आहे. प्रत्येक हॉस्पिटल्सने किमान तीन दिवस पुरेल एवढा ऑक्सीजन साठा राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्यासाठी आतापासूनच तयारी कऱणे अभिप्रेत आहे. ज्या हॉस्पिटल्सची ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी क्षमता नाही, अशा छोट्या हॉस्पिटल्सने एकत्र येत लिक्विड मेडीकल ऑक्सीजनसाठी साठवणूकीची क्षमता निर्माण करणे आणि ऑक्सीजन मिळण्यासाठी संबंधित कंपन्यांबरोबर करार करणे आवश्यक आहे.
 
संभाव्य लाटेच्या अनुषंगाने ही तयारी आताच केली तर आरोग्य यंत्रणांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ही लाट लगेच येऊ नये यासाठी सर्वांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कार्यवाही आवश्यक आहे. तसेच, लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. संभाव्य रुग्ण शोधून त्यांची चाचणी केली जाणे महत्वाचे आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकेल. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !