◻ घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात १०० बेडच्या ऑक्सीजन कोविड सेंटरचे विस्तारीकरन.
संगमनेर Live | कोरोनाच्या संकटात ग्रामीण रुग्णालयातून सुमारे तीन हजार रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. या संकटात केलेले काम हे ईश्वराचे काम असून आगामी तिसऱ्या लाटेचा मोठा संभाव्य धोका लक्षात घेऊन घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासह नवीन शंभर बेडच्या व्यवस्थेसाठी कोवीड केअर सेंटर विस्तारीकरणाचे काम होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे ट्रामा केअर सेंटरच्या पहिल्या मजल्यावर अद्यावत ऑक्सिजन कोविड सेंटर विस्तारीकरण कामाचा शुभारंभ नामदार थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे हे होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, जि.प. सभापती सौ. मीराताई शेटे, जि. प. सदस्य सिताराम राऊत, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, महेंद्र गोडगे, उपसभापती नवनाथ आरगडे, विष्णुपंत रहाटळ, सरपंच सोपान राऊत, भाऊसाहेब पानसरे, मच्छिंद्र राऊत, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. सुरेश घोलप, डॉ. प्रशांत थोरात, उपअभियंता सौरभ पाटील आदी उपस्थित होते.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय हे जिल्ह्यातील अद्ययावत रुग्णालय असून येथे कोरोणा संकटाच्या काळात तीन हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. याच बरोबर या रुग्णालयात राज्यातील पहिले आरटीपीसीआर मशीन असून पाच बायपप व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नव्याने शंभर बेड या हॉस्पिटलमध्ये वाढविण्यात येणार असून महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात येणार आहे.
याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले की, हे जगावर आलेले मोठे संकट आहे. संगमनेर तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाने गोरगरिबांना आधार देत अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत. हे त्यांच्यासाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नव्याने ऑक्सिजन पुरवठ्यासह १०० बेड वाढविण्याकरता या कोवीड सेंटरचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या सर्व काळामध्ये येथील डॉक्टर, नर्सेस त्यांचा सर्व स्टाफ आणि या कार्यात सहभाग घेणारे सर्वांनी खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा केली आहे. आगामी लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अत्यंत काळजी घेणे गरजेचे असून कोणीही निष्काळजीपणा करू नका.
या लाटेत सुमारे पन्नास लाख रुग्ण होण्याचा मोठा धोका असल्याने आपल्याला सतर्कता व काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विविध खाजगी रुग्णालयांना सुद्धा ऑक्सीजन निर्मितीसाठी सूचना करण्यात आली असून थोरात कारखान्याने ही ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात सुद्धा स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आ. डॉ. तांबे, डॉ. संदीप कचोरीया, सिताराम राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर .पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजकुमार जऱ्हाड यांनी केले.