◻ विविध सामाजिक संघटनाचा सहभाग ; रक्तदान करण्याचे आवाहन.
संगमनेर Live | ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेअतर्गत संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील चालक मालक संघटना, जैन नवकार ग्रुप, आश्वी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार दि. १२ जुलै रोजी आश्वी बुद्रुक बाजारतळावरील जिल्हापरिषद मुलींच्या शाळेत सकाळी ९ ते २ या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकमतचे पत्रकार योगेेश रातडीया यानी दिली आहे.
कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थायलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह, अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शाेधणे व त्याचा रक्त गट जुळविणे हे अतिशय जिकरीचे काम असते. तसेच विविध शस्रक्रियासाठी रक्ताची गरज भासते. त्यामुळे या सर्वाना जीवनदान देण्यासाठी रक्त दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा तुटवडा असल्याने डाॅक्टरांना रुग्णांवर उपचार करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच कोविड १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर लोकमतने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेला राज्यभरात सुरवात केली आहे.
सामाजिक भान जपत आश्वी परिसरातील चालक मालक संघटना, जैन नवकार ग्रुप व आश्वी ग्रामपंचायत यानी या मोहिमेत पुढाकार घेतला असून चालक मालक संघटनेचे बबन खेमनर, दिलावर शेख, सागर जऱ्हाड, राहुल ताजणे, रियाज शेख, दिपक बर्डे, गणेश पांढरे, राहुल साठे तर नवकार ग्रुपचे भगवान बोरा, निलेश चोपडा, योगेश लुंकड, प्रशांत गांधी, रोहित भंडारी, वैभव भंडारी, अभिजीत गांधी, नितिन गांधी तसेच आश्वी बुद्रुकचे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड व दै. लोकमतचे पत्रकार योगेश रातडीया आदिनी सहभागी होऊन उद्या मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन केले आहे.
कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या असल्या तरी रक्तदात्याच्या माहितीसाठी..
१८ ते ६० वयोगटातील कोणतीही व्यक्ती रक्तदान करु शकते. कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते तर दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते.