◻ संगमनेर येथे पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन.
संगमनेर Live | स्व. विलासराव देशमुखांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून राज्यात नव्हे तर देशात वेगळा ठसा उमटविला. विकासात्मक कामातून तळागाळातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवून अनेक लोक कल्याणकारी योजना त्यांनी राबविल्या. कायम हसतमुख व बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या स्व. विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर येथे यशोधन संपर्क कार्यालयात मा. मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नामदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, नगरसेवक नितीन अभंग, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, सुभाष सांगळे, सुरेश झावरे, अॅड. त्रिंबक गडाख, सुभाष कुटे, तात्या कुटे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नामदार थोरात म्हणाले कि, राजकारणात स्व. विलासराव देशमुखांबरोबर काम करण्याची अनेक वर्ष संधी मिळाली. त्यांनी कायम आपल्यावर विश्वास टाकला. राज्यात विविध विकास योजना राबवितांना सर्व सामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयाला प्राधान्य देवून सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची त्यांची पध्दत विशेष लोकप्रिय होती.
राजकारणाबरोबरच कला, क्रिडा, साहित्य, नाटय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतून चाहता वर्ग निर्माण केला. प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान, भाषेवर प्रभुत्व, कलागुण संपन्न व्यक्तीमत्व यामुळे स्व. विलासराव देशमुख राज्याच्या राजकारणात नेहमीच अग्रभागी राहिले. राज्याचे नेतृत्व करत असतांना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतून जिव्हाळ्यााचे संबंध निर्माण केले.
राजकारणापलीकडे दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून स्व. विलासराव देशमुख संपूर्ण राज्याला परिचीत होते. सतत कार्यमग्न राहून आलेल्या प्रसंगाना आपल्या खास शैलीतून सामोरे त्यांची पध्दत वैशीष्टे पूर्ण होती. जनतेच्या प्रश्नांसाठी धाडसाने निर्णय घेवून त्यांची अमलबजावणी करण्यात ते नेहमीच तत्पर असायचे. शेतकर्यांच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक निर्णय घेवून ते नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहत होते. देशपातळीवरच्या राजकारणात एक वेगळा ठसा त्यांनी उमटविला. नगर जिल्ह्याबरोबरच संगमनेर तालुक्यावर कायम त्यांनी प्रेम केले. त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व व जीवन कार्यकर्तृत्व काँग्रेस कार्यकर्त्यांना कायम प्रेरणादायी असल्याचे ही ते म्हणाले.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, संगमनेर शहरासाठी ऐतिहासिक ठरलेल्या निळवंडे थेट पाईप लाईन योजनेसाठी नामदार बाळासाहेब थोरात यांना त्वरीत मंजुरी देवून त्यांनी संगमनेरच्या विकास कामांसाठी कायम मदत केली. दरम्यान यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.