संगमनेर तालुक्यात भरदिवसा बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात महिला ठार!
◻️ निमगाव टेंभी येथील दुर्दैवी घटनेने तालुक्यात खळबळ
संगमनेर LIVE | बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कपडे धुत असलेल्या संगीता शिवाजी वर्पे (वय - ४२) या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करत ठार केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील वर्पे वस्तीवर घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही दुर्दैवी घटना भर दिवसा घडल्यामुळे खळबळ उडाली असून परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संगीता या पती व मुलांसह निमगाव टेंभी येथे राहतात. शेती व दुग्धव्यवसाय करुन हे कुटुंब उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे घरातील सर्व कामे उरकून त्या धूणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या धुणं धुत असलेल्या ठिकाणानजीक गिनी गवत, मकाची शेती व झाडं झुडप जास्त असल्याने लंपन क्षेत्र आहे. यामध्ये शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या महिलेवर प्राणघातक हल्ला करुन तिला ४० ते ५० फूट आत गिनी गवतात ओढून नेले.
यावेळी महिलेची किंकाळी ऐकून नातेवाईक धावत आले. यातील एकाने ट्रॅक्टर थेट शेतात घातल्यामुळे बिबट्या पळाला. मात्र मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर आता बिबटे थेट मोठ्या माणसावर हल्ला करत असल्याने भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या कुटुंबाला वनविभागाने न्याय द्यावा यासह परिसरात पिंजरे लावुन हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरात वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्यामुळे वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.