“विखेना पाडून आलोय” असे गृहमंत्री अमित शहांना म्हणालो - निलेश लंके
◻️ शिबलापूर येथे खासदार निलेश लंके यांचा सत्कार सोहळा संपन्न
◻️ माझ्या शिवाय पर्याय नाही या भ्रमात राहु नका!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “सरकार बदलती है। दिन बदलते है। कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. त्यामुळे सत्तेचा वापर समाजाच्या विकासासाठी करा, विरोधकांना त्रास देण्यासाठी नव्हे” अशी टिका नाव घेता नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे आयोजित सत्कार समारंभात खासदार लंके बोलत होते. यावेळी त्यांची तुला करून त्यांच्या वजना इतक्या वह्या गरीब मुलांना वाटण्यासाठी देण्यात आल्या. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच निलेश लंके आश्वी परिसरात म्हणजे मंत्री विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आले होते. त्यामुळे लंके काय बोलणार? हे ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या कारणास्तव पोलीसांचा मोठा फौजफाटा देखील हजर होता.
खासदार लंके पुढे म्हणाले की, समाजाला संरक्षण देण्याची जबाबदारी ही लोक प्रतिनिधीची असते. त्यामुळे मी पोलीस संरक्षण वापरण्याचा दिखाऊपणा करत नाही. चांगलं काम करणाऱ्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष येत असला तरी, एक दिवस त्याला चांगले दिवस पाहयला मिळत असतात. खा. राहुल गांधी, पंतप्रधान मोदी साहेब, खा. अखिलेश यादव यांना फक्त टिव्हीवर पाहत होतो. लोकांमुळे त्यांच्या समवेत संसदेत बसण्याची संधी मिळाली.
माझ्या कुटुंबात साधा ग्रामपंचायत सदस्य सुध्दा नसताना माझी लोकसभा निवडणूक देशासाठी दिशादर्शक ठरल्याचे सांगताना लंके म्हणाले, “लोक आता म्हणू लागले की, निलेश लंके जर खासदार होऊ शकतो तर आम्ही आमदार का होऊ शकत नाही.” लाख मोलाची माणसें कमावल्यामुळेचं लोकसभेत जाण्याची संधी मिळाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच उद्या आपले सरकार आल्यानंतर पद देखिल मिळेल असा विश्वास लंके यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सत्ताधाऱ्यांचे नाव न घेता टिका करताना लंके म्हणाले की, राजकारणात विरोधकांना चुकीच्या पध्दतीने त्रास देऊ नका. उलट तुम्ही विरोधकांच्या मदतीसाठी फोन केला पाहिजे. म्हणजे तो देखील गरजेच्या वेळी तुमच्या पाठीशी उभा राहील. कितीही मोठा बाहुबली किंवा शहेनशाह असला तरी तो दोन्ही हातांनी जास्तीत जास्त दहा लोकांना मारु शकतो, मात्र तेच दोन्ही हात तुम्ही जोडले तर लाखों लोकांच्या मनावर राज्य तुम्ही करु शकता. त्यामुळे माझ्या शिवाय पर्याय नाही या भ्रमात कोणी राहु नये. असा इशारा नाव न घेता खासदार निलेश लंके यांनी यावेळी दिला.
संसद भवनातील अनुभव सांगताना खासदार लंके म्हणाले की, संसद भवनात उभे असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले. तेव्हा त्यांना थांबवून म्हणालो “ओ.. साहेब थांबा! आम्हाला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे. त्यांनी फोटो देखील काढून दिला.” यावेळी मी त्यांना माझ्या बरोबर असलेल्या खासदाराची ओळख करुन देताना म्हणालो कि, “बजरंग बाप्पा सोनवणे हे पंकजाताईना पाडून आलेत, भास्कर भगरे सर हे भारतीताई पवार यांना पाडून आलेत, कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांना पाडून तर मी विखेना पाडून आलो आहे.”