आश्वी येथील दोघांचा नगर येथे झालेल्या भिषण अपघातात मृत्यू!
◻️ ऐन दिवाळीत झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे पंचक्रोशीत शोककळा
◻️ दोघांचा अंत्यविधी शेजारी - शेजारी ; अग्नी डाग देताचं उपस्थित नागरीक गहिवरले
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल मुरलीधर खेमनर (वय - ६५) आणि माजी ग्रामपंचायत सदस्य जाखोबा राणु पिलगर (वय - ५५) या दोघांचा नगर - मनमाड महामार्गावर शिंगवे नाईक शिवारात झालेल्या भिषण अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आश्वीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, विठ्ठल खेमनर आणि जाखोबा पिलगर हे दुचाकीवरून पाडव्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री क्षेत्र बाबीर बाबा येथे देवदर्शनासाठी जात होते. नगर - मनमाड रस्त्यावरील शिंगवे नाईक शिवारात कंटेनर आणि त्यांच्या दुचाकीचा भिषण अपघात झाला. ही घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि बाबीर देवस्थानला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अहिल्यानगर येथील रुग्णालयात दोघांनाही उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
विठ्ठल मुरलीधर खेमनर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. तसेच जाखोबा राणु पिलगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ऐन दिवाळीत या दोघांचा दुर्दैवी व आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे आश्वीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
दरम्यान शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास दोघांचाही अंत्यविधी एकाचं वेळी शेजारी - शेजारी आश्वी बुद्रुक येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात करण्यात आला. यावेळी विशाल जनसमुदाय उपस्थित होता. याप्रसंगी दोघांनाही अग्नी डाग देताचं उपस्थित नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार गहिवरल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.