‘ झिका व्हायरस ’ बचावासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहन.

संगमनेर Live
0
 ◻ जिल्ह्यात सद्य:स्थितीत झिका आजाराचा एकही रुग्ण नसल्याची आरोग्य विभागाची माहिती.
 
संगमनेर Live (अहमदनगर) | राज्यात पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस आढळून आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही आरोग्य यंत्रणेने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांनी केले आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत झिका आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
केरळ नंतर महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला आहे. झिका हा डासामार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असून फलॅव्हीव्हायरस प्रजातीच्या एडिस डासांमार्फत पसरतो. झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. यामध्ये ताप, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा आणि डोकेदुखी इ. लक्षणे आढळतात. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची असून २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारामध्ये दवाखान्यात भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. या आजाराचा त्रास जाणवू लागल्यास रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी, निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे. तापाकरिता पॅरासिटामॉल औषधे वापरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित तापरुग्ण सर्वेक्षण करण्यात येते. एकात्मिक किटक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येतात. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येऊन पाणी साठविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडयाची नियमित पहाणी करुन डासोत्पत्ती आढळलेली भांडी रिकामी करण्यास प्रवृत्त केले जाते. तसेच रिकामे न करता येणाऱ्या भांडयामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत अॅबेट (टेमिफॉस) टाकण्यात येते.  
 
नागरिकांनी या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे. परिसरातील साचलेल्या निकामी, निरुपयोगी वस्तू नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवणे. परिसरातील डबकी बुजविणे, गटारी वाहती करणे. इमारतीवरील तसेच जमिनीखालील पाण्याच्या टाक्‍यांना डासोत्पत्ती होऊ नये याकरिता घटट्‌ झाकण बसविणे. खिडक्यांना / व्हेंट पाईपला डास प्रतिबंधक जाळया बसविणे. योग्य त्या डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडणे. 'एडीस डास दिवसा चावत असल्याने अंगभर कपडे घालावेत तसेच दिवसा झोपतांना देखील मच्छरदाणीचा वापर करावा. झिका आजाराचा धोका गरोदर मातांना जास्त असल्याने त्यांनी डासांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी. असे आवाहन डॉ. सांगळे आणि डॉ. साळुंके यांनी केले आहे.
 
झिका आजारावर कोणतेही विशिष्ट ओषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे. तापरूग्ण व किटकशास्त्रीय सर्वेक्षणासाठी घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा तसेच ताप आल्यास तात्काळ नजीकच्या शासकिय अथवा खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावा, अहमदनगर जिल्ह्यात सध्यस्थितीत झिका आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे डॉ. सांगळे यांनी स्पष्ट केले आहे.
 
झिका हा एडिस डासापासून होणारा आजार आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती रोखण्याकरिता अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हिवताप विभागाकडून करण्यात येत आहेत. जनतेने डासांची उत्पत्ती होऊ नये याकरिता आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घर व परिसरात पाणी साचू देऊ नये, तसेच परिसरातील निकामी व निरुपयोगी वस्तूची तात्काळ विल्हेवाट लावावी,परिसर स्वच्छता ठेवावा, असे आवाहन डॉ. साळुंके यांनी केले आहे. 

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !