संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरत्या १३ व्या नारळी सप्ताहाचे बुधवार दि. ८ डिसेंबर ते बुधवार १५ डिसेंबर दरम्यान वरंवडी येथिल रामेश्वर व उबरेश्वर मठाचे महंत हभंप दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले असून सप्ताहस्थळी बुधवारी महंत दत्तगिरी महाराज याच्या हस्तें ध्वजारोहण करण्यात आले.
धार्मिक कार्यात आग्रेसर असलेल्या शेडगाव येथिल शेतकऱ्यानी १० एकर क्षेत्र अखंड हरिनाम सप्ताह आयोजनासाठी उपलब्ध करुन दिले आहे. बुधवारी ध्वजारोहण असल्याने ग्रामस्थानी हाती भगवे ध्वज, टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत भावभक्तीपूर्वक मिरवणूक काढली होती. २५ फूट उंचीच्या खांबावर याठिकाणी वारकरी संप्रदायाची पताका उभारली गेली आहे.
याप्रसंगी मंगलमय वातावरणात महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्तें व समस्त शेडगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधिवतपणे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी १० एकर क्षेत्रावर मंडप उभारणी सुरु असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमाचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करत भाविकानी नियमाचे पालन करताना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान या सप्ताहकाळात नामवंत किर्तणकार आपली सेवा देणार असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे शेडगाव ग्रामस्थानी सप्ताहस्थळी जोरदार तयारी केली आहे. गावातील तरुण तसेच ग्रामस्थं यामध्ये सहभागी झाल्याने गावात मंगलमय सण - उत्संवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंचक्रोशीतील भाविकानी या सप्ताह सोहळ्यासाठी आठ ही दिवस मोठ्या संख्येने शासकीय नियमाचे पालण करत उपस्थित राहावे असे आवाहन महंत दत्तगिरी महाराज व शेडगाव ग्रामस्थानी केले आहे.