◻ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा पहिल्या फळीतील शिलेदार काळाच्या पडद्याआड
◻ विविध संस्थाचे संचालक तर १९९९ ते आजतागायत शेतकी संघाचे चेअरमन
संगमनेर Live (संजय गायकवाड) | थोर स्वातंत्र्य सेनानी व सहकार महर्षी भाऊसाहेब सतुंजी थोरात यांचे पहिल्या फळीतील सहकारी असलेले संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल जेष्ठ नेते शिवाजीराव प्रतापराव थोरात (वय - ७५) हे मागील अनेक दिवसापासून आजारी होते. अखेर रविवारी पहाटे त्याचे निधन झाले असून त्याच्या निधनामुळे राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यानी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्यां पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, चार भाऊ, भावजया, पुतणे, नातंवडे असा मोठा परिवार आहे.
पानोडीचे माजी उपसरपंच विनायक थोरात, औरंगाबाद खंडपीठातील विधीतज्ञ अँड. इद्रंजित थोरात व पानोडीचे विद्यमान उपसरपंच विक्रम थोरात याचे शिवाजीराव थोरात हे वडील होते. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक अँड. भवानराव थोरात, मुंबई उच्च न्यायालयाचे विधितज्ञ अँड. शंकरराव थोरात, संगमनेर न्यायालयातील विधितज्ञ अँड. सदाशिव थोरात व पानोडीचे माजी पोलीस पाटील बंळवंतराव थोरात यांचे शिवाजीराव थोरात बंधू होते.
थोर स्वातंत्र्य सेनानी व सहकार महर्षी भाऊसाहेब सतुंजी थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील पुर्व तसेच पठार भागातील स्वर्गीय बाळकृष्ण पाटील दातीर, बाजीराव पाटील खेमनर, पाराजी पाटील चकोर, कै. विठ्ठल सोनवणे या पहिल्या फळीतील सहकार्यानमध्ये शिवाजीराव थोरात यांचा समावेश होता. राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे ते निकटवर्तीय म्हणून तालुक्यात ओळखले जायचे.
पानोडीचे थोरात घराणे हे पेशवे काळापासून जहागिरदार घराणे म्हणून संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात परिचित आहे. शिवाजीराव थोरात यांचा १९४८ साली जन्म झाला होता. ते पानोडी येथिल शिवराव भवानराव थोरात विद्यालयाचे संस्थापक चेअरमन होते. अहमदनगर जिल्हापरिषदेचे सदंस्य, संगमनेर कारखाण्याचे संचालक, सह्याद्री विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेरचे संचालक आदि पदे त्यानी भुषवली असून संगमनेर शेतकी संघाचे १९९९ पासून आजतागयात म्हणजे २३ वर्ष ते चेअरमन म्हणून काम पाहत होते.
शिवाजीराव थोरात यांच्या निधनानंतर सोशलमिडीयाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहण्यात येत असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग आदि क्षेत्रातील मान्यवर श्रध्दांजली अर्पण करत आहेत. रविवारी (दि. १३) रोजी सायंकाळी ३.३० वा. पानोडी येथे त्याच्या पर्थिव देहावर अत्यंसंस्कार होणार असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयानी दिली आहे.
दरम्यान राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे तसेच राजकारण, विविध क्षेत्रातील मातब्बरासह विविध संस्थाचे पदाधिकारी व अधिकारी या अत्यंसंस्कारावेळी उपस्थित राहणार असून सहकारातील खंदा समर्थक तालुक्याने गमावल्याची भावना नागरीकाकडून व्यक्त होत आहे.