◻ राजुरी येथील शहीद जवान अनिल विष्णुपंत गोरे याच्यां स्मारकाचे लोकार्पण
संगमनेर Live (लोणी) | सिमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत, ही जाणीव ठेवून, राजुरी येथील शहीद अनिल गोरे यांचे उभारण्यात आलेले हे स्मारक प्रेरणादायी आणि देशभक्तीचे प्रतिक ठरेल असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. सैनिकांप्रती आणि शहिद जवानांप्रती प्रत्येकाने निष्ठा ठेवून त्यांचा आदर करावा असे आवाहनही त्यांनी केले.
राहाता तालुक्यातील राजुरी येथील शहीद जवान अनिल विष्णुपंत गोरे हे लेह लडाख सिमेवर कार्यरत असताना २४ फेब्रुवारी २०१९ रोजी विरमरण आले. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शहिद अनिल गोरे स्मारक समिती आणि लोकसहभागातून साकार झालेल्या शहिद स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमात माजीमंत्री आ. विखे पाटील बोलत होते.
याप्रसंगी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या कविता लहारे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, वीरपीता विष्णुपंत गोरे, वीरमाता रंजना गोरे, वीरपत्नी तेजस्वीनी गोरे, माजी सैनिक संघटनेचे विजय कातोरे, रामायणचार्य नवनाथ महाराज म्हस्के, शौर्यचक्र प्राप्त वीरपत्नी कल्पना शेंदल, सेना मेडल प्राप्त वीरपत्नी रेखाताई खैरनार, त्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा सरदार, माजी सैनिक संघटनेचे मनोहर भोसले, कारखान्याचे संचालक सतीष ससाणे, रामचंद्र जवरे, प्रकाश गोरे, माजी उपसभापती बाबासाहेब म्हस्के, सरपंच सुरेश कसाब, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.सोमनाथ गोरे, डॉ. बी. टी गोरे, काकासाहेब गोरे, विजय बोडखे आदीसंह जिल्ह्यातील आजीमाजी सैनिक उपस्थित होते.
आपल्या भुमिपुत्राची आठवण ठेवून उभे राहीलेले हे स्मारक गावासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, प्रत्येक गावामध्ये सैनिकांचा सन्मान होण्याची गरज आहे. यातून नव्यापिढीला सैनिकांबद्दल आदर निर्माण होवून, तरुणांचा सैन्यदलात जाण्याकडे कल वाढेल, कारगील घटनेनंतर सैनिकांप्रत निष्ठा वाढली. आज गावागावातील सैनिकांचा सन्मान होण्याची गरज आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत हा आत्मविश्वास सैनिकांच्या कुटुंबाला देण्याची गरज असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.
राजुरीचे हे स्मारक जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. गोरे परिवार हा एकटा नाही, सामाजिक दायित्व म्हणून प्रवरा परिवार सदैव आपल्या पाठीशी राहील. शहिद अनिल गोरे यांचे हे स्मारक आपल्यासाठी स्वप्नपुर्ती आहे. हे काम स्मारक समितीने आदर्श केले याचा मोठा अभिमान असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचे सैनिकाप्रती अभिमान बाळगा, त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत ही जाणीव कायम ठेवण्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात विजय कातोरे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. दत्तात्रय धनवटे यांनी तर आभार सरपंच सुरेश कसाब यांनी मानले.
प्रवरा परिवाराची मदत स्मारकासाठी आणि शहिद गोरे परिवारासाठी महत्वपूर्ण ठरली आहे. प्रवरा परिवाराने वीरकन्या अंकीता हिला शिक्षणासाठी दत्तक घेतले. त्याबरोबरच गोरे परिवारासाठी वेगवेगळ्या योजनेतून केलेली मदत ही महत्वपूर्ण बाब ठरली. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हे स्मारक आम्ही पुर्ण करु शकलो याचा मोठा अभिमान असल्याचे स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ गोरे यांनी सांगितले.