राज्यात ७ हजार २३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया

संगमनेर Live
0
पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार

◻ गृहविभागाची अधिसूचना जारी

संगमनेर Live (मुंबई) | महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७ हजार २३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.

शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे (२० गुण). १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत. 

तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ कि.मी. धावणे (५० गुण), १०० मीटर धावणे (२५ गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १०० गुण असणार आहेत.

शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. 

परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पद्धतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठित केलेले निवड मंडळ शारीरिक व लेखी मध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रिकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करेल.

दरम्यान या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !