◻ पठारभागातील दुर्दैवी घटना
◻ सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे काम
संगमनेर Live | सध्या सर्वत्र पावसाचे धुमशान सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी वीजधक्का व सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. पूरात वाहून जाण्याच्याही घटना घडत आहेत. अशातच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपाचे उप सरपंच यांना विजेचा तीव्र धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १४ जुलै) सकाळी समोर आली आहे. यामुळे संपूर्ण पठारभागात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपळगाव देपाचे उप सरपंच प्रदीप गवराम गुंड (वय - ३३) याना काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसला होता. ही माहिती गावात पसरताच गावकर्यांनी तत्काळ त्यांच्या घरी धाव घेतली.
त्यानंतर उपचारासाठी त्याना संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मयत असल्याचे घोषित केले. यानंतर कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पिंपळगाव देपा येथील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
दरम्यान, मयत उप सरपंच प्रदिप गुंड यांचे सामाजिक व राजकीय वलय मोठे होते. तरुणांचे संघटनही मोठे होते. त्यांना विजेचा धक्का बसल्याची बातमी गावात पसरताच मोठा जमाव गोळा झाला होता. मात्र, नियतीने आधीच डाव साधल्याने त्यांना उपस्थित सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
यावेळी सर्वजण त्यांच्या कुटुंबाला धीर देताना हळवे झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण पठारभाग शोकसागरात बुडाला आहे.