◻ घारगांव येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेत पात्र ९०० लाभार्थ्यांना साधन साहित्याचे वितरण
◻ सत्ता गेल्यानंतर यांना गाव आणि जनता आठवली
◻ फोन ऐकून सामान्य माणसावर आणि कार्यकर्त्यावर कारवाया करण्याचे धंदे बंद करा
संगमनेर Live | कोव्हीड संकटात तालुक्याला वाऱ्यावर सोडून देणारे नेते आता गावोगावी फिरू लागले आहेत. सत्ता आणि पदं गेल्यानंतर यांना आता जनतेची आठवण झाली आहे. सत्ता गेल्याचे दु:ख या नेत्यांना असून, वैफल्यग्रस्त झालेले नेते आता रस्त्यावर उतरले असले तरी, जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही अशी सडेतोड टिका महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील घारगांव येथे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेत पात्र ९०० लाभार्थ्यांना साधन साहित्याचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जेष्ठनेते शिवाजीराव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आ. वैभव पिचड, बापूसाहेब गुळवे, भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शिवाजीराव धुमाळ, भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम यांच्यासह आधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे देशातील जेष्ठ नागरीकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात झाली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ४२ हजार जेष्ठ नागरीकांना या योजनेचा लाभ मिळाला. याकडे लक्ष वेधून या राज्यातील जनतेला सर्व योजनांचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. मागील अडीच वर्षे या राज्यात तीन पक्षांचे सरकार होते. पण कोणतीही मदत ते जनतेला करु शकले नाहीत. कोव्हीड संकटातही सरकार मधील मंत्री जनतेबरोबर राहीले नाहीत, सत्तेमध्ये असताना जनतेचा विसर पडला आता सत्ता गेल्यानंतर यांना गाव आणि जनता आठवली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार हे विकासाच्या माध्यमातून या राज्याला पुन्हा पुढे घेवून जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच सरकार सत्तेवर येताच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. पेट्रोल डिझेलवरील करामध्ये कपात केली. हे सरकार जनतेचे हित पाहाणारे आहे. केंद्र सरकारचे सहकार्य राज्याला मिळणार असल्यामुळे विकासाची गती अधिक वेगाने पुढे जाईल असेही त्यांनी सांगितले.
राज्यात बदल झाला असल्यामुळे तालुक्यातील आधिकाऱ्यांनी आता स्वत:मध्ये बदल करुन घ्यावा, लोकांसाठी काम करावे आता इतरांचे फोन ऐकून सामान्य माणसावर आणि कार्यकर्त्यावर कारवाया करण्याचे धंदे बंद करा. यापुर्वी झाले ते खुप झाले आता माफीया आणि ठेकेदारांसाठी कामे होणार नाहीत तर सामान्य माणसांसाठी कामे होतील हे प्रशासनातून दाखवून द्या असे मंत्री ना. विखे पाटील यांनी उपस्थित आधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेची माहीती देतानाच या योजनेचा लाभ मिळवून देतानाच कुठल्याही लाभार्थ्यांला पाच पैसेही द्यावे लागले नाहीत. मी दक्षिणेचा खासदार असलो तरी, तालुक्यातील पठार भागात येवून हे साहित्य वाटत आहे. तालुक्याच्या नेतृत्वाने असे कधी काम केले का.? असा प्रश्न उपस्थित करतानाच विखे पाटील कुटूंबिय जनतेसाठी काम करणारे असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पठार भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे कोणत्याही सत्काराचे कार्यक्रम या कार्यक्रमात न घेता केवळ श्रध्दांजली वाहून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.