बदलत्‍या डिजीटल शिक्षण पध्‍दतीनुसार शिक्षकांनी बदल स्विकारणे आवश्‍यक - महसूलमंत्री

संगमनेर Live
0
◻️ जिल्‍हा शिक्षक पुरस्‍काराचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्तें वितरण

◻️ मतदारसंघातील सर्व शाळा डिजीटल करणार

संगमनेर Live (अहमदनगर) | देशाची आणि जगाची गरज ओळखुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्‍या कौशल्‍य व व्‍यवसायभिमुख नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आणि बदलत्‍या डिजीटल शिक्षण पध्‍दतीनुसार शिक्षकांनी बदल स्विकारुण विद्यार्थ्‍यांना शिकविणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्‍धविकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. जिल्‍हा परिषदेतर्फे आयोजित जिल्‍हा शिक्षक पुरस्‍कार वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

कल्‍याण रोडवरील द्वारका लॉन्‍स येथे जिल्‍हा शिक्षक पुरस्‍कार २०२०, २०२१ आणि २०२२ वितरण समारंभ आयोजित करण्‍यात आला होता. या समारंभात खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्‍कर पाटील आदी मान्‍यवर यावेळी व्‍यासपीठावर उपस्थित होते.

महसूल मंत्री ना. विखे पाटील पुढे म्‍हणाले की, शिक्षण क्षेत्रात ज्ञानसाधनेला खुप महत्‍व आहे. या ज्ञान साधनेच्‍या जोरावर शिक्षक तसेच विद्यार्थी उच्‍च पदावर पोहोचु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतुन देशात तसेच राज्‍यात नवीन शैक्षणिक धोरण आमलात येत आहे. यामुळे भविष्‍यात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होतील. 

या नवीन शैक्षणिक धोरणाची जबाबदारी शिक्षकांनी स्विकारुन याबरोबरच मुलांना आपल्‍या मुळ संस्‍कृतीबद्दल सुध्‍दा शिक्षकांनी अवगत करावे. या संदर्भातील माहिती मुलांना मिळण्‍यासाठी त्‍यांच्‍या शैक्षणिक सहली कृषी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिलेल्‍या नेवासे आणि अन्‍य महत्‍वाच्‍या ठिकाणी आयोजित कराव्‍यात व त्‍यांना सुजाण नागरीक बनवण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा. डिजीटल शाळा उपक्रम राज्‍यातील जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये राबविणे आवश्‍यक आहे. माझ्या मतदारसंघातील सर्व शाळा डिजीटल करण्‍यासाठी मी प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात खा. डॉ. सुजय विखे पाटील म्‍हणाले, शिक्षण क्षेत्रात आज शैक्षणिक दर्जासोबतच, शैक्षणिक साधन सुविधा महत्‍वाच्‍या आहेत. त्‍या मुलांना उपलब्‍ध करून देण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे. समाजानेसुध्‍दा एकत्र येऊन यासाठी लोक वर्गणीच्‍या माध्‍यमातुन पैसा उपलब्‍ध करावा व त्‍याचा विनियोग उत्‍तम शिक्षण देण्‍यासाठी करावा. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातुन शिक्षण विभागासाठी निधी उपलब्‍ध झाला पाहिजे, असे त्‍यांनी सांगितले. 

जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुर्वीची गुरूकुल शिक्षण पध्‍दती कशी श्रेष्‍ठ होती याविषयी उदाहरणासह माहिती दिली. शिक्षकांनी येणाऱ्या काळात ध्‍येय निश्चित करून शिक्षण क्षेत्रात काम करावे. त्‍यामुळे त्‍यांना यश प्राप्‍त करणे सोपे होईल. 

कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षातील एकुण ४६ शिक्षकांना पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. यात प्रातिनिधीक स्‍वरूपात पुरस्‍कारार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमात जिल्‍हा परिषद शिक्षण विभागातर्फे तयार करण्‍यात आलेल्‍या नवोदय व शिष्‍युवृत्‍ती पुर्वतयारी मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. प्रास्‍ताविकात जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्‍हा परिषद शिक्षण विभागातर्फे राबविण्‍यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व विभागाच्‍या कामकाजाची माहिती दिली. 

या कार्यक्रमाला जिल्‍हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्‍य, माजी पंचायत समिती सभापती आणि सदस्‍य, जिल्‍ह्यातील विविध शाळांचे पुरस्‍कारार्थी शिक्षक आणि त्‍यांचे कुटुंबीय तसेच इतर शिक्षक उपस्थित यावेळी होते.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !