◻आश्वी पोलीस ठाण्यात दोघावर गुन्हा दाखल
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे जुन्या भांडणाच्या रागातून समीर बाळकृष्ण होडगर यांची दुचाकी भर चौकात आणून पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली असून आश्वी पोलीस ठाण्यात दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास समीर होडगर हा आश्वी बुद्रुक येथे गँरेजसमोर उभा असताना रविंद्र उर्फ बंटी मदने हा त्या ठिकाणी आला व त्याने शिविगाळ करत एक मोठा दगड उचलून समीर यांच्या पाठीत दोन ते तीन वेळा मारला. त्यामुळे समीरने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ‘माझ्या नादी लागला कारे, आता तुला जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने समीरच्या डोक्यात दगड मारत दुखापत केली. यावेळी जखमी झालेला समीर हा मदने याच्या तावडीतून सुटून पळाला. यावेळी एका अल्पवयीन मुलाने समीरची दुचाकी आश्वी बुद्रुक बस स्थानकावर ढकलत आणली. यानतंर दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली असल्याचे दाखल तक्रांरीत म्हटल्याने आश्वी पोलीस ठाण्यात गन्हा रजिस्टर क्रमांक १६९/२०२२ नुसार भादंवी कलम ३०७, ३२४, ५०४, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, हवालदार निलेश वर्पे, रवीद्रं वाकचौरे, दहिनिवाल, वाघ आदि पोलीस कर्मचाऱ्यानी आरोपी रविंद्र उर्फ बंटी मदने (रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) ताब्यात घेतले.
पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणाचा पंचनामा केला आहे. मदने याच्यावर याआधी आश्वी व घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे स्वतः करत आहे.