◻️ ना. विखे पाटील यांच्या सुचनांनंतर गौण खनिजाची उपलब्धता
संगमनेर Live | गौण खनिजाची उपलब्धता झाल्याने निळवंडे कालव्यांच्या कामाला पुन्हा गतीने सुरुवात झाली आहे. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला याबाबतीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांनंतर कालव्यांच्या कामासाठी नियमाप्रमाणे गौण खनिज उपलब्धतेचा मार्ग मोकळा झाला आहे. अकोले तालुक्यासह संगमनेरातही गौण खनिज उपलब्ध होण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी बैठका घेवून संबधितांना सुचना दिल्याने कालव्यांच्या कामातील सर्व अडथळे दुर झाले आहेत.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशामुळे गौण खनिज उपलब्ध होण्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते. त्यातच महसूल विभागाने बेकायदेशिरपणे उत्खनन केल्या जाणाऱ्या दगड खाणींबाबत कडक धोरण घेतले होते. तसेच बेकायदेशिर वाळू उपसाही थांबविला गेल्याने निळवंडे कालव्यांची कामे काही काळ थांबली गेली होती.
गौण खनिजा अभावी कोणतेही सरकारी प्रकल्पाचे काम थांबणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. त्यानुसार मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची बैठक होवून यामध्ये सरकारी प्रकल्पांना तसेच उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांकरीता गौण खनिज उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी महसूल प्रशासनास मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. त्यानंतर गौण खनिज उपलब्ध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या संदर्भात स्थानिक पातळीवर प्रांताधिकाऱ्यांना काही आधिकारही देण्यात आले असून, कालव्यांच्या कामाला गौण खनिज उपलब्ध होण्यासाठी दगडखाण व्यवसायीकांची बैठकही घेण्यात आली आहे. या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी अटी आणि नियमानूसार निळवंडे प्रकल्पाला गौण खनिज उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत.
दरम्यान या बैठकीस निळवंडे प्रकल्पाचे आधिकारीही उपस्थित होते. या बैठकी नंतर अकोले तालुक्यात कालव्यांच्या कामाला सुरुवात झाली असून, संगमनेर तालुक्यातील कामांनाही आता गती मिळणार आहे.