◻️ महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्पष्ट इशारा
◻️ शासनाचे दायित्व बुडवून सुरु असलेला हा व्यवसाय आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहायचा का.?
◻️ कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी लम्पि आजारा संदर्भात केलेल्या टिकेची उडवली खिल्ली
संगमनेर Live (लोणी) | अवैध धंद्यांविरोधात कारवाई व्हावी ही सामान्य माणसाचीच इच्छा होती. अवैध गौण खनीज आणि बेकायदेशिर वाळू उत्खननाबाबत सरकारने सुरु केलेल्या करवाईमुळे यासर्व बेकायदेशिर व्यवसायाला मोठा लगाम बसणार आहे. शासनाचे दायित्व बुडवून सुरु असलेला हा व्यवसाय आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहायचा का.? असा सवाल करुन, राज्यात या अवैध उत्खनना विरोधात कारवाई सुरुच राहील असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना मंत्री ना. विखे पाटील म्हणाले की, अवैध गौण खनीज उत्खनन आणि वाळू माफीयांवर संपूर्ण राज्यात कारवाई सुरु आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ही कारवाई कोणा एका व्यक्ति आणि पक्षा विरोधात नाही, परंतू त्यांना वाईट वाटणे स्वभाविक आहे असे स्पष्ट करुन, आजपर्यंत राजकीय दबावापोटी कारवाया होत नव्हत्या. प्रशासनाने सुध्दा या अवैध धंद्याकडे डोळेझाक केली होती, प्रशासन सर्व गोष्टी सहन करीत होते. सरकारचे अब्जावधी रुपयांचे दायित्व बुडविले जात होते. महसूल खात्यातील अनेक आधिकाऱ्यांवर या माफीयांकडून हल्ले झाले, त्यांना जीवे मारण्याचे प्रकार घडले यासर्व पार्श्वभूमिवर राज्य सरकारने कठोर पाऊल उचलली आहेत. या सर्व बेकायदेशिर उत्खनना विरोधात सरकारची कारवाई सुरुच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारने सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात अनेकजण आता पत्रकबाजी आणि आंदोलनाचा स्टंट करीत आहेत. ते नेमके कोणाचे समर्थन करीत आहेत याचा तरी खुलासा त्यांनी करावा. अवैध उत्खनन करणाऱ्यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का असा सवाल करुन, ना. विखे पाटील म्हणाले की सरकारने सुरु केलेल्या कारवाईचे या सर्वांनी खरेतर समर्थन केले पाहीजे असे सांगून विखे पाटील म्हणाले की, गौण खनीजाच्या कारणामुळे एकही सरकारी काम बंद पडणार नाही, निळवंडे कालव्यांच्या कामासाठी गौण खनीज उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व सुचना व आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहेत. गौण खनीज उपलब्धते बाबत सर्व आधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले असून, राज्यात गौण खनीज आणि वाळू संदर्भात सरकार लवकरच धोरण आणून यासर्व व्यवसायामध्ये पारदर्शकपणा कसा येईल असा प्रयत्न करीत असल्याचे मंत्री विखे पाटील यानी सांगितले.
कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी लम्पि आजारा संदर्भात केलेल्या टिकेची खिल्ली उडविताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, बेछुट आरोप करणे आणि प्रसिध्दीच्या झोतात राहणे हा नाना पटोलेंचा स्वभावच आहे. याला लम्पि आजार तरी काय करणार, सरकारने लम्पि आजाराच्या संदर्भात प्रभावीपणे काम केल्यामुळेच राज्यात पशुधन वाचविण्यात यश आले आहे. याची आकडेवारी नाना पटोलेंकडे पाठविण्याची माझी तयारी आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पशुधन आधिकाऱ्यांवर हल्ला झालेल्या घटनेची आम्ही गंभिर दखल घेतली असून, अशा प्रकारचे हल्ले होणे उचित नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.