मांगूर माशाची वाढती तस्करी धोकादायक.!

संगमनेर Live
0

◻️ मानवी आरोग्यसह पर्यावरणाचेही होतेय नुकसान

◻️ मांगुर मासा म्हणजे काय.? माशावर बंदी का असू शकते.?

◻️ दै. पुण्यनगरीचे वृत्तसंपादक विकास अंत्रे यानी घेतलेला विशेष आढावा

संगमनेर Live | दिवसेंदिवस वाढणाऱ्या मांगुर माशाच्या तस्करीबाबत पोलीस कारवाईच्या बातम्या आल्या आणि अनेक वाचकांना प्रश्न पडला मांगुर मासा म्हणजे काय.? माशावर बंदी का असू शकते.? मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला हा मासा कसा हानी पोहोचवू शकतो, हेच सांगणारे आजच्या दैनिक पुण्यनगरीमधील स्पेशल आर्टिकल...!

मासे खाणे आरोग्यासाठी हितकारक असले तरी मांगूर मासा खाणे मात्र माणसासाठी धोकेदायक आहे. आफ्रिकन मांगूर माशामुळे कॅन्सर, डायबिटीस सारखे आजार होऊ शकतात. शिवाय हा मासा मासांहारी असल्याने पर्यावरणालाही हानी पोहोचवतो. या माशाचे पालन व विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली असली तरी मांगूर माशाची दिवसेंदिवस वाढती तस्करी धोकादायक ठरणार आहे.

मांगूर मासा डबक्यात, चिखलात, गटारात जगू शकतो. शिवाय हा मासा पाण्याव्यतिरिक्तही जगतो. एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत मांगूरची लांबी असते.पाण्यातील मृत मासे, किडे, जंतू हे त्याचे खाद्य आहे. छोटया माशांनाही मांगूर भक्ष्य करतो. यामुळे भारतीय माशांच्या प्रजाती धोक्यात येत आहेत. त्याचे मास चरबीयुक्त व बॅक्टेरिया पोषक असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे अनेक हानीकारक आजारांचा धोका निर्माण होतो.

या माशाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यास निर्माण होणारा धोका आणि जैवविविधतेची साखळी नष्ट होऊन पर्यावरणाची होणारी हानी यामुळे या माशावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. पण तरीही चोरी-छुपे या माशाची तस्करी करून विक्री केली जात आहे. 

एकट्या नगर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी मांगूर माशाची वाहतूक करणारे तीन वाहने पकडली. मांगूर तस्करीची पहिली घटना नोव्हेंबर महिन्यात श्रीरामपूरमध्ये उघडकीस आली. आयशर ट्रक ताब्यात घेऊन पोलिसांनी तीन टन मांगूर मासा जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

दुसरी कारवाई पोलिसांनी नगर-सोलापूर रोड वरील रुईछत्तीशी येथे केली. या कारवाईतही साडेपाच टन मांगूर मासा व ट्रक जप्त करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे पिकअपमध्ये दीड टन मांगुर मासा घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कारवाई करत असले तरी या माशाची तस्करी चोरीछुपे सुरूच आहे. ती रोखायचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

हा मासा आरोग्यास हानिकारक असला तरी या माशाबाबत सामान्य, गोरगरीब माणसांना फारशी माहिती नाही. तो १०० ते १२० रुपये किलो दराने स्वस्तात उपलब्ध होतो. शिवाय त्याच्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गोरगरीब लोकांचा हा मासा खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. हायवेवरील अनेक छोटया हॉटेलमध्ये या माशाची फिशकरी इतर माशांच्या फिशकरीच्या तुलनेत स्वस्तात मिळते. त्यामुळे हायवेवरील ढाब्यांवर या माशाला ग्राहक मिळत आहे. परिणामी बंदी असूनही हा मासा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

पालघर तालुक्यातील समुद्रालगतच्या भागात तसेच मुंबईजवळील भिवंडी, पुणे जिल्ह्यातील उजनी जलाशयाजवळ बेकायदेशीरपणे अनेक जण या माशाचे पालन करीत आहेत. याच भागातून हा मासा आला की, आणखी कुठून याचा शोध अहमदनगर पोलीस घेत आहेत. शासनाचा मत्स्य विभाग व पोलिसांनी या माशाच्या सेवनामुळे होणाऱ्या अपयांवर जनजागृती करणे आवश्यक आहे. ती केली तरच गोरगरिबांकडून होणारी या माशाची खरेदी थांबू शकेल. मांगूरला मागणीच राहिली नाही तर आपोआप या माशाची पालन व तस्करी थांबेल.

शारीरिक हानी..

मांगूर माशाचे खाद्यच सडके, कुजलेले मास, रोगट प्राण्यांचे अवशेष असल्याने असा मासा खाल्ल्याने कॅन्सर, डायबिटीससह अनेक आजार होऊ शकतात.

पर्यावरणाचे नुकसान..

मांगूर मासा खादाड आणि आक्रमक प्रवृत्तीचा असल्याने नदी, नाल्यांमधील स्थानिक प्रजातींच्या माशांना फस्त करीत आहे. या माशाचे पालन न थांबल्यास स्थानिक प्रजातीचे मासे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लोक का खातात..

मरळ, वाम, शिंगडा, झिंगा या भारतीय माशांच्या तुलनेत निम्म्या किमंतीत मांगूर स्वस्तात उपलब्ध होतो. त्याला इतर माशांच्या तुलनेत जास्त मास असते. शिवाय काटे नसतात. टबमध्ये जिवंत मासे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गोरगरीब, कष्टकरी वर्गाकडून याची मागणी जास्त केली जात आहे.

अशी आली कायद्याने बंदी..!

पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असलेल्या मांगूर माशाची प्रजाती नष्ट करण्याचे आदेश केंद्र सरकारने दि. १९ डिसेंबर १९९७ रोजी दिले. त्यानंतर १९९८ मध्ये मांगूर माशाचे पालन व विक्रीवर बंदी घालणारे केरळ पहिले राज्य ठरले. महाराष्ट्र सरकारनेही दि.१६ जून २०११ रोजी मांगूर माशावर बंदी घातली. पण या विरोधात २०१८ मध्ये हरित लवदाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. तिचा निकालही सरकारच्या बाजूने लागला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने दि.२२ जानेवारी २०१९ रोजी पासून मांगूरचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे.

लेखक मा. विकास अंत्रे हे दै. पुण्यनगरीच्या श्रीरामपूर कार्यालयाचे वृत्त संपादक आहेत. मो - 9421556882

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !