*संग्रहित छायाचित्र*
◻️ विद्यार्थ्यानचे महाविद्यालयीन शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर?
◻️ विद्यार्थ्यासह पालक वर्गात संताप
संगमनेर Live | संमनेरच्या ग्रामीण भागातील रहिमपूर, ओझर, जोवेॅ आदी परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी एसटी महामंडळाचा महिन्याचा प्रवासाचा पास काढून देखील संगमनेर आगाराकडून सुरू असणारी संगमनेर - रहिमपूर - ओझर ही एसटी बस कधी येते, कधी येत नसल्याने विद्यार्थी वर्गाचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोनाच्या अगोदर संगमनेर आगारातून संगमनेर, जोर्वे, रहिमपूर, ओझर, उंबरी बाळापुर, आश्वी बुद्रुक आणि अगदी लोणी पर्यत बस सेवा सुरू होती. त्यामुळे आश्वी, उंबरी बाळापुर, ओझर, रहिमपूर, जोवेॅ, वाकण वस्ती, निंबाळे आदी परिसरातील विद्यार्थ्यांची संगमनेर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाण्या येण्याची कुठलीही अडचण नव्हती.
मात्र कोरोनाच्या नंतर या मार्गावरील बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्याच्या महाविद्यालयीन शिक्षणावर झाला असून विद्यार्थ्यांना संगमनेरला शिक्षणासाठी जाण्या येण्यासाठी दुसरे साधन नसल्याने त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आले आहे.
यापैकी काही विद्यार्थी कसेबसे संगमनेरला पोहोचतात मात्र विद्यार्थिनींची मोठी अडचण या निमित्ताने सुरू झाली आहे. विशेष म्हणजे संगमनेर आगाराने या मार्गावर असणाऱ्या विद्यार्थ्याना महिन्याचा प्रवासाचा एसटीचा पास दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसानही सुरू आहे.
तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सकाळी सात वाजता महाविद्यालयात प्रॅक्टिकल असते, असे असतानाही सकाळची सहाची एसटी बस कधी येते, कधी येत नसल्याने विद्यार्थिनींची प्रॅक्टिकलला दांडी बसत आहे. याचा परिणाम विद्यार्थिनींच्या शालेय जीवनावर झाला असून या मार्गावर पूर्वी धावणाऱ्या सगळ्याच एसटी बस तात्काळ सुरू कराव्यात अन्यथा संगमनेर आगारात आंदोलन केले जाईल असा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे.