बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल - मुख्यमंत्री

संगमनेर Live
0
◻️ विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण

संगमनेर Live (मुंबई) | स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची शिकवण, विचार आणि ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा घेऊन पुढे जात आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खासदार गजानन किर्तीकर, माजी मंत्री रामदास कदम यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांवर आणि त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा दिवस महत्वाचा आहे. अनेक कार्यकर्ते विधिमंडळात त्यांच्यामुळे पोहोचू शकले. मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावले जातेय हा महत्वाचा क्षण आहे. बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी राज्य चालवले. सर्वसामान्यांपर्यंत सत्ता पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. बाळासाहेबांच्या परीस स्पर्शाने अनेकांचे सोने झाले, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांचे विचार ऐकताना ऊर्जा येते आणि प्रेरणा मिळते. अन्याय विरूध्द लढण्याचे बळ मिळते. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. ते गुरुस्थानी होते.

शत्रू राष्ट्रालाही त्यांची जरब वाटायची. ते उत्तुंग आणि हिमालयाएवढं व्यक्तिमत्त्व होते. मात्र, तितकेच ते कोमल हृदयाचे होते. लोकांच्या अडचणी बाबत ते कायम जागरूक असायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, धाडस आणि आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला. त्यांच्या विचारात ओतप्रोत राष्ट्रभक्ती भरलेली होती. विचारांशी तडजोड त्यांनी कधी केली नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी रिमोट कंट्रोलचे काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक विचारधारांचा मिलाफ आढळून यायचा. विभिन्न क्षेत्रातील अनेकांवर संकटे आली तेव्हा त्यांच्या पाठीमागे बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी नेहमी केले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम स्व. बाळासाहेबांनी केले - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील जसा विशाल महासागर आहे तसे आणि आवश्यक तेव्हा तुफानापेक्षा अधिक संघर्ष करणारे बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्र आणि देशाच्या नेत्यांच्या मांदियाळीतले वेगळेपण दाखवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

बाळासाहेब यांच्यामध्ये एक ऊर्जा होती. ती कायम कार्यकर्त्यांमध्ये रुजविण्याचे काम केले. त्यांचा मनाचा मोठेपणा हा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अनुभवल्याची आठवण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.

ते म्हणाले की, स्पष्टवक्तेपणा हा बाळासाहेबांचा गुण होता. एकदा बोललेले वक्तव्य परत घेण्याची वेळ त्यांनी येऊ दिली नाही. तत्वासाठी कायम राजकारण केले. त्यांनी कधी जातपात पहिली नाही. अनेकांना त्यांनी निवडून आणून दाखवले. जातिव्यवस्थेचा पगडा कमी करण्याचे काम त्यांनी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

बाळासाहेबांच्या तैलचित्रातून प्रत्येक जण प्रेरणा घेईल. विचारांची प्रतिबद्धता त्यांनी शिकवली. त्या विचारांसोबत असणे हीच त्यांना श्रद्धांजली होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, की स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समाजकारणाची संधी मिळाली. त्यांनी सामान्यांतील सामान्य माणसावर विश्वास दाखविला. त्यांच्या विचारानुसार महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी संघटना स्थापन केली. त्यांनी मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली.

विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जातीपातीच्या पलिकडे जाऊन बाळासाहेबांनी काम केले.

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे यांनी बाळासाहेब हे देशाला दिशा देणारे नेतृत्व होते, असे सांगितले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. त्यांचे राष्ट्रहिताचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील. मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिला. त्यांच्यामुळेच मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे होऊ शकला.

मंत्री केसरकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे उत्कृष्ट व्यंगचित्रकार, संपादक आणि सामाजिक सुधारणांचे अग्रणी होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिले.

यावेळी विधान सभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या संकल्पनेवर आधारित आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप चवरे लिखित ‘झंझावात’ हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. चित्रकार किशोर नांदिवडेकर यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विधानभवन परिसरात बाळासाहेबांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

अभिनेते प्रसाद ओक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी मानले. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विविध देशांचे वाणिज्य दूत, नागरिक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !