◻️ बिबट्याचा धुमाकुळ सीसीटीव्ही कँमेरात कैद
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल शेतकरी लक्ष्मण हनुमंता गायकवाड यांच्या बंदिस्त गोठ्यात मंगळवारी रात्री घुसून बिबट्याने शेळीचे दोन करडं ठार केल्याची घटना घडली असून यामुळे अंदाजे २० हजार रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या गट नंबर १८३ मध्ये असलेल्या गायकवाड वस्ती येथे शेतकरी लक्ष्मण हनुमंता गायकवाड यांचा शेळ्याचा गोठा व वस्ती आहे. नेहमी प्रमाणे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गायकवाड हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून गोठ्याची पाहणी करत होते.
यावेळी त्यांना गोठ्यात शेळ्याची करडं घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फिरवून पाहिला असता एका बिबट्याने गोठ्यात येऊन एका करडावर हल्ला चढवल्याचे पाहिले. त्यानतंर त्यानी आरडाओरड करत गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट्याने तेथून पलायन केले. यावेळी गोठ्याच्या कडाला एक असे दोन बिबट्ये गायकवाड यांच्या नजरेस पडले आहे. त्यामुळे घाबरलेल्या गायकवाड यानी गोठ्यात जाऊन पाहिले असता बिबट्याने शेळीचे दोन करडं ठार केल्याचे त्याच्या लक्षात आले.
यानंतर गायकवाड यानी वनविभागाला फोन करुन याबाबत माहिती दिली. बुधवारी या हल्ल्याचा वनविभागाने पंचनामा केला आहे. दरम्यान शेतकरी लक्ष्मण हनुमंता गायकवाड यांचे यामुळे अंदाजे २० हजार नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून वनविभागाने त्याना तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यानी केली आहे.