◻️ मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी सहा महिन्याचा अभ्यासक्रम मोफत
◻️ आश्वी बुद्रुक येथिल सिद्धिविनायक कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये मिळणार रोजगाराभिमुख मोफत प्रशिक्षण
◻️ ‘सारथी’ व ‘एमकेसीएल’चा पुढाकार
संगमनेर LIVE | मराठा - कुणबी समाजातील युवक - युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी ‘सारथी’ व ‘एमकेसीएल’ यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्यविकास प्रशिक्षण हा मोफत अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाइन नावनोंदणी करावी, अशी माहिती 'एमकेसीएल'चे जिल्हा समन्वयक गणेश आठरे यांनी दिली आहे.
युवक - युवतींनी एमकेसीएलच्या संगमनेर तालुक्यातील अधिकृत प्रशिक्षण केंद्र आश्वी बुद्रूक येथील सिद्धिविनायक कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये अधिक माहिती संपर्क साधावा, असे आवाहन सिद्धिविनायक कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका सौ. चेतना अश्विन मुथा यांनी केले आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) यांच्याद्वारे हा अभ्यासक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. मराठा, कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींसाठी हा अभ्यासक्रम मोफत आहे. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून, १० हजार युवक- युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण एमकेसीएलचे अधिकृत केंद्रामार्फत दिले जाईल. परिसरातील निमगाव जाळी, दाढ, आश्वी बुद्रूक, आश्वी खुर्द, पानोडी, शिबलापूर, वरंवडी, खांबा, हंगेवाडी, मालुंजे, डिग्रस आदी गावांतील युवक-युवतींना याचा लाभ घ्यावा.
दरम्यान मागील १६ वर्षांपासून आश्वी परिसरात सिद्धिविनायक कॉम्प्युटर एज्युकेशन हे कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी नावाजलेले एकमेव केंद्र आहे. आतापर्यंत येथून विद्यार्थी - विद्यार्थ्यानी प्रशिक्षण पूर्ण करत त्याचा लाभ त्यांना शासकीय, खासगी नोकरीकरिता झाला आहे. प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या उमेदवारांची छाननी होऊन ती संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.
दरम्यान २२ मार्चपासून नोंदणी सुरू झाली आहे. सरकारच्या माध्यमातून या समाजातील युवकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. केवळ नोकरीच्या मागे न लागता युवकांनी वेगवेगळे व्यवसाय करावेत, यासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच भाग म्हणून अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. आगामी काळात त्याचा चांगला फायदा युवकांना होणार आहे.