◻️ जोर्वे आणि पंचक्रोशितील वाड्या वस्त्यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार
◻️ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे निधीची उपलब्धता
◻️ सरपंच सौ. प्रिती गोकूळ दिघे यांची माहिती
संगमनेर Live | जोर्वे आणि पंचक्रोशितील वाड्या वस्त्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे १४ कोटी ६१ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपुजन समारंभ रविवारी संपन्न होणार आहे. या निमित्ताने अन्य ही २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि व्यक्तिगत लाभाच्या योजनेतील अनुदानाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहीती सरपंच सौ. प्रिती गोकूळ दिघे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनेकरीता जलजीवन मिशन सुरु करण्यात आले आहे. जोर्वे आणि पंचक्रोशितील गावांकरीता या योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याप्रस्तावाला मंजुरी मिळून केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यांतून सुमारे १४ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.
या योजनेच्या कामांचा शुभारंभ महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. होणार असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व विभागांचे आधिकारी, सहकारी संस्था आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिर्डी विधानसभा मतदार संघात जोर्वे गावाचा समावेश झाल्यानंतर या गावाच्या पायाभूत सुविधांकरीता मंत्री विखे पाटील यांनी सातत्याने निधीची उपलब्धता करुन दिली आहे. व्यक्तिगत लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच राहिले आहेत.
दरम्यान रविवारी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमातही व्यक्तिगत लाभाच्या योजनांचे धनादेश मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सौ. प्रिती गोकूळ दिघे यांनी केले आहे.