◻️ श्रध्दाला पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून ३ लाख रुपयाची प्रोत्साहनपर मदत
◻️ सर्वात कमी वयाची अँनलॉग अँस्ट्रॉनॉट म्हणून श्रध्दा गुंजाळ ही भारताचे प्रतिनिधीत्व करणार
संगमनेर LIVE | अंतराळ संशोधनाची आवड जोपासून यामध्ये स्वत:चे करीअर घडविणाऱ्या संगमनेरच्या श्रध्दा गुंजाळ या विद्यार्थीनीस पोलंड येथील युरोपीयन स्पेस एजन्सीमध्ये पुढील एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३ लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. जगभरातून निवड झालेल्या ६० विद्यार्थ्यामध्ये श्रध्दा गुंजाळ ही भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे.
नासाच्या इंटरनॅशनल एअर अँन्ड स्पेस प्रोग्रामसाठी केनडी स्पेस सेंटर येथे निवड झालेल्या जगातील साठ जणांपैकी श्रध्दा गुंजाळ ही एकमेव भारतीय विद्यार्थींनी आहे. त्यानंतर आता पोलंड मध्ये एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी तीची निवड झाली असून, यामध्ये इटली, स्विझरलंड, जर्मनी, युएसए, रशीया व भारत या सहा देशांचा यामध्ये समावेश असून, सर्वात कमी वयाची अँनलॉग अँस्ट्रॉनॉट म्हणून श्रध्दा गुंजाळ ही भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
श्रध्दा गुंजाळ हिला अंतराळाबद्दल शालेय जीवनापासूनच प्रचंड आस्था आहे. अतिशय मेहनतीने आणि याक्षेत्रातील बारकावे आत्मसात करुन, तीने आजपर्यंतचे यश मिळविले आहे. पुण्याच्या एमआयटी महाविद्यालयात एरोनॉटीक्स इंजिनिअरींग या चार वर्षांच्या पदवी शिक्षणामध्ये तीने प्रवेश घेतला असून, शिक्षण सुरु असतानाच इंटरनॅशनल अँस्ट्रॉईड सर्च कॅम्पेनमध्ये सहभाग घेवून पृथ्वीच्या दिशेने येणारा घातक अँस्ट्रॉईड तिने शोधला. या संशोधनाबद्दल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वल्ड ऑफ रेकॉर्डचा सन्मानही तीला मिळाला.
दरम्यान पोलंड येथे जाण्यापुर्वी श्रध्दा गुंजाळ हिने पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील सदिच्छा भेट घेतली होती. या भेटी दरम्याने श्रध्दाने केलेल्या वाटचालीचे विखे पाटील यांनी कौतुक करुन तिला अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रशिक्षणासाठी सहाय्य केले आहे.