◻️ जोर्वे आणि आश्वी जिल्हा परिषद गटातील ४ हजार १६१ विद्यार्थ्याना शासकीय दाखल्यांचे वितरण
◻️ चिंचपूर, निमगावजाळी, उंबरी, आश्वी खुर्द, शिबलापूर, पिंप्री लौकी, अजमपुर, झरेकाठी, चणेगाव या गावाचा समावेश
◻️ सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्तें ‘आनंदाचा शिधा किट’चे झाले वितरण
संगमनेर LIVE | शाळा, महाविद्यालयामधील प्रवेशांकरीता आवश्यक असलेले शासकीय दाखले सोप्या पध्दतीने मिळावेत या उद्देशाने महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘अर्ज एक दाखले अनेक’ ही सुरु केलेली योजना सर्वांसाठीच महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.
जोर्वे आणि आश्वी जिल्हा परिषद गटातील चिंचपूर, निमगावजाळी, उंबरी, आश्वी खुर्द, शिबलापूर, पिंप्री लौकी, अजमपुर, झरेकाठी, चणेगाव या गावांमधील ४ हजार १६१ विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शासकीय दाखल्यांचे वितरण सौ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्येक्षविद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व, डोमासाईल्ड आणि डोंगरी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह तहसिलदार अमोल निकम, गटविकास आधिकारी अनिल नागणे, नायब तहसिलदार कडनोर उपस्थित होते. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदाचा शिधा किटचे वितरण करण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजन योजनेच्या उपक्रमाची पाहाणी मान्यवरांनी केली.
आपल्या भाषणात सौ. विखे पाटील म्हणाल्या की, केंद्र आणि राज्य सरकार सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत आहे. समाजातील शेवटचा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असून, यातूनच खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची प्रक्रीया घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील आठ महिन्यात विकासाची प्रक्रीया वेगाने घडत आहे. आपल्या सर्वांचे नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील महसूल आणि पशुसंवर्ध विभागाच्या माध्यमातून लोकाभिमुख निर्णयांची प्रक्रीया सुरु केली आहे. महसूल विभागातील कारभार पारदर्शी आणि चांगल्या पध्दतीने व्हावा, सामान्य माणसाची अडवणूक थांबविण्यासाठी त्यांनी सुरु केलेले उपक्रम सामाजिक हित जोपासणारे आहेत.
यापुर्वी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह पालकांना शासकीय दाखल्यांसाठी मारावे लागणारे हेलपाटे आता कमी होणार आहेत. आता एकाच अर्जावर अनेक दाखले मिळण्याची योजना महसूल विभागात सुरु झाल्याने याचा मोठा दिलासा विद्यार्थी आणि पालकांना मिळेल असे स्पष्ट करुन, सौ. विखे पाटील म्हणाल्या की, कामगारांसाठी मध्यान्ह भोजन आणि गावासाठी शुध्द आणि स्वच्छ पाणी अशा योजनांमधून विकासाची प्रक्रीया वेगाने सुरु असून, सर्वच शासकीय योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदार संघात यशस्वीपणे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.