◻️ सहाशे वाचकांचा तुकाराम गाथा परायणात सहभाग
संगमनेर LIVE (लोणी) | लोणी बुद्रुक येथे गुरुवारी अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करून उत्साहात आरंभ झाला. सप्ताह निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम गाथा पारायणात सुमारे सहाशे वाचकांनी सहभाग नोंदवला आहे.
सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची ४३ वी पुण्यतिथी व तांत्रिक शिक्षणाचे प्रणेते लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९१ व्या जयंती निमित्ताने लोणी ग्रामस्थांनी या सप्ताहाचे आयोजन केले आहे.
महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते घटस्थापना आणि गाथा पूजन करून सप्ताहाचा आरंभ करण्यात आला.
व्यासपीठ चालक किसन महाराज पवार, विजय महाराज कुहिले आणि भारत महाराज धावणे यांच्या समवेत गाथेतील प्रारंभीक अभंगांचे वाचन सौ.विखे पाटील यांनी वाचकांसोबत केले. यावेळी लोणी बुद्रुक ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटीसह इतर संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावर्षी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथेचे पारायण होत असून सुमारे सहाशे वाचकांनी त्यात सहभाग नोंदवला आहे. सप्ताह काळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कीर्तन सेवा देणार असून रात्री ७ ते ९ कीर्तन झाल्यानंतर भाविकांना दररोज भोजन प्रसादाची व्यवस्था ग्रामस्थांनी केली आहे तर वाचकांसाठी जगन्नाथ पुरी व इतर तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या ५ मे रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.