◻️ हा सभासद आणि शेतकऱ्यांसोबत विश्वासघात
◻️ सत्तेचा गैरवापर जनता सहन करणार नाही
◻️ त्यांना दहा वर्षात जे जमले नाही ते पाच वर्षात काय जमणार.?
संगमनेर LIVE (अहमदनगर) | ‘संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना, साखर आयुक्तांकडे तातडीची बैठक घेऊन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याला पाच वर्षे कराराने चालवायला देणे हा शेतकरी, सभासद आणि कामगारांशी विश्वासघात आहे. यापूर्वी दहा वर्ष गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याच्या ताब्यात होता, त्याच काळात गणेश कारखाना संकटात सापडला, त्यांना दहा वर्षात जे जमले नाही ते पाच वर्षात काय जमणार ? मुळात हा करार कारखाना चालवण्यासाठी नाही तर कारखाना कायमचा बंद करण्यासाठी केलेला आहे, सत्तेचा हा गैरवापर गणेश परिसरातील सभासद व शेतकरी सहन करणार नाही’ असा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
माजी मंत्री थोरात म्हणाले, ‘श्री गणेश सहकारी साखर कारखाना आसवणी प्रकल्पासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पाच वर्षांसाठी भागीदारी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याचे कळते. यासंदर्भातील घटनाक्रम अत्यंत संशयास्पद आहे. ३० मे रोजी साखर आयुक्तांकडून बैठकीची सूचना आणि लगेचच त्याच दिवशी बैठक आणि तातडीने गणेश कारखाना भाडेकराराने देण्याचा निर्णय घेणे. कोणाच्या दबावातून हे सर्व केले जात आहे, याची जाणीव जनतेला आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे.’
आ. थोरात पुढे म्हणाले, ‘निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना केलेला हा करार बेकायदेशीर आहे, न्यायालयातही आणि सभासद शेतकऱ्यांच्या दरबारातही तो टिकणार नाही. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी, सभासद व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी मी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे, गणेश परिसराच्या विकासाची ही कामधेनु जिवंत राहण्यासाठी ही लढाई आम्ही लढत आहोत. त्यांचा हेतू जरी गणेश बंद करणे असा असला तरी, गणेशचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि ही संस्था चालवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’
‘श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे खरे मालक असलेल्या सभासद आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन हा भाडेकरार होतो आहे. सत्तेचा हा गैरवापर सभासद आणि शेतकरी सहन करणार नाही. ‘गणेश’ वाचविण्यासाठी सर्व पातळ्यांवर आम्ही लढणार आहोत’, असेही थोरात म्हणाले.