◻️ आरोग्य केद्रांतर्गत १९ गावाचा समावेश
◻️ अंदाजे ५० हजार लोकसंख्येचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील नेहमी गजबजलेल्या असलेल्या आरोग्य केंद्रांत १९ गावातील नागरीकांना मागील काही दिवसांपासून समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नुकत्याचं झालेल्या ग्रामसभेत नागरीकानी आरोग्य केद्रांतील समस्यांचा पाढा वाचला आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आश्वी पंचक्रोशीतील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमीचं गजबजलेले, वर्दळीचे ठिकाण व बाजारपेठ असलेल्या आश्वी खुर्द येथे सरकारी प्राथमिक आरोग्य केद्रं आहे. या आरोग्य केद्रांतर्गत १९ गावे येत असून यामध्ये आश्वी खुर्द, दाढ खुर्द, खळी, चणेगाव, झरेकाठी, पिप्रीं - लोकी अजमपूर, पानोडी, डिग्रंस, मांलुजे, अंभोरे, कोळवाडे, पिपंरणे, जाखुरी, हंगेवाडी, कनोली, कनकापूर, ओझर बुद्रुक या गावातील अंदाजे ५० ते ६० हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे. तर या आरोग्य केद्रांतर्गत ८ उप केद्रं देखिल कार्यरत आहे. १९ गावातील गोर-गरीब नागरीक, महिला पुरुष यांच्यासह लहान मुले व जेष्ठ नागरीक यांना या आरोग्य केंद्राचा आधार आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरीकाना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कारण याठिकाणी आरोग्य कर्मचारी हे नियमित उपस्थित नसतात. उपचारासाठी अथवा इतर कामांसाठी आलेल्या नागरिक व पदाधिकारी यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी हे रात्री आरोग्य केंद्रांत उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना या ठिकाणी येऊन हात हलवत खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दड सोसावा लागत आहे. तसेच हे अधिकारी व कर्मचारी नागरीकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ग्रामसभेला उपस्थित राहत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरीकाना आवश्यकता असताना अॅम्बूलन्स उपलब्ध होत नाही. अशा विविध समस्याचा पाढा यावेळी आयोजित ग्रामसभेत नागरीकानी मांडला आहे.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी यांनी याबाबत आश्वी खुर्द येथील आरोग्य अधिकारी यांच्याकडे खुलासा मागितला असून नागरिकांच्या तक्रांरीबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
शवविच्छेदनगृह ठरले ‘शो पीस’
आश्वी खुर्द येथिल प्राथमिक आरोग्य केद्रांसाठी जिल्हापरिषद निधीतून शवविच्छेदनगृह बांधून देण्यात आले आहे. मात्र हे शवविच्छेदनगृह मागील ७ ते ८ वर्षापासून बंद अवस्थेत असून शवविच्छेदनगृह बांधुन झाल्यानतंर अद्यापही या खोलीचा प्रत्यक्षात वापर सुरू झालेला नाही. त्यामुळे शवविच्छेदनगृह बांधणीसाठी झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. परिणामी, ही खोली बंद अवस्थेत आहे.
त्यामुळे शवविच्छेदन खोली बांधण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर अनेक वेळा मृतदेहाची हेळसांड होत असून शवविच्छेदन करण्यासाठी नागरीकांना मृतदेह संगमनेर अथवा लोणी याठिकाणी घेऊन जावा लागतो. सद्यःस्थितीत ‘शो पीस’ ठरलेले हे शवविच्छेदनगृह वापरात आणून ग्रामीण भागातील जनतेची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.