◻️दत्त मंदिरापासून निघणाऱ्या शांती मोर्चात नागरिकांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहन
संगमनेर LlVE | मणिपूर येथील हिंसाचाराने आणि तेथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराने देशातील संवेदनाशील नागरीक अस्वस्थ झाले आहेत. गेले ८४ दिवस मणिपूर अशांत आहे. केंद्र व राज्यसरकार मणिपूर मध्ये शांतता निर्माण करु शकलेले नाहीं. सरकारने तेथील इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे दहशत वाढली आहे. सुमारे साठ हजार नागरिक बेघर झाले आहेत. १५० स्त्री पुरुष मारले गेले आहेत.
३ मे २०२३ रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्याची धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना मागील आठवड्यापर्यंत देशाला समजली नाही. सरकारने आरोपींवर कारवाई केली नाही. त्यामुळे मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या शुक्रवार दि. २८ जुलै रोजी दुपारी १ वा. शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली आहे.
ॲड. निशा शिवूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, बेटी बचाव, बेटी पढाव म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी या विषयावर मौन धारण केलेले होते. अत्याचार करणारे गुन्हेगार मोकाट फिरत होते. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर नरेंद्र मोदींनी या घटनेवर भाष्य केले. त्यात मणिपूर मधील हिंसाचाराचे गांभीर्य दुर्लक्षित करुन पंतप्रधानांनी विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यातील हिंसक घटनांचा दाखला दिला. केंद्र व राज्य सरकारची भूमिका हिंसाचार करणाऱ्यांना समर्थन देणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात देशभर शांततावादी नागरिकांनी निषेध जाहीर केला आहे. शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी संगमनेरच्या शांतता प्रिय स्त्री पुरुष नागरिकांचा शांती मोर्चा आयोजित केल्याची महिती समाजवादी जन परिषदेच्या ॲड. निशा ताई शिवूरकर आणि महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या अनिल भोसले यांनी दिली आहे.
दरम्यान संगमनेर बस स्टँड जवळील दत्त मंदिरापासून दुपारी एक वाजता निघणाऱ्या या शांती मोर्चात नागरिकांनी मोठया संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन कारभारी देव्हारे, प्रा. शिवाजी गायकवाड, ॲड. ज्ञानदेव सहाणे, विनोद गायकवाड, दीपक कदम, बाबा खरात, बाबुराव गायकवाड, इंदुमती घुले आदिनी केलें आहे.