◻️ जम्मु कश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांना महसूल मंत्री ना. विखे पाटील यांची सर्वतोपरी मदतीची विनंती
◻️ जम्मु आणि कश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्याने भाविक अडकले
संगमनेर LIVE (लोणी) | अमरनाथ यात्रेकरीता गेलेल्या भाविकांना संकटकाळात मदत व्हावी म्हणून महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट जम्मु कश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून सहकार्य उपलब्ध करुन दिल्याने अडकलेल्या भाविकांचा परतीचा मार्ग अखेर सुकर झाला.
अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रेकरीता श्रीरामपूर, कोल्हार, लोणी या भागातील असंख्य नागरीक गेले होते. मात्र जम्मु आणि कश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्याने तसेच पाऊसामुळे श्रीनगर ते जम्मु या मार्गावरील रस्तेही खचल्याने सर्व भाविकांना अडकून पडावे लागले. अडकलेल्या भाविकांना लष्कराच्या सहकार्याने आहे त्या परिस्थितीत उपलब्ध ठिकाणी मुक्कामही करावा लागला. या भाविकांपैकी अनेकांनी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी थेट संपर्क साधला तेव्हा मंत्री विखे पाटील आश्वी येथे महाजनसंपर्क अभियानाचा कार्यक्रमास उपस्थित होते.
परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी जम्मु कश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून भाविकांना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली. राज्यपाल महोदयांनही महाराष्ट्रातील सर्वच भाविकांना मदत करण्याची ग्वाही देत नगर जिल्ह्यातील भाविकांनाही मदत करण्याचे आश्वासित केले. काही वेळातच या भाविकांपर्यंत यंत्रणा पोहोचली असल्याचेही त्यांनी मंत्री विखेपाटील यांना सांगितले. केलेल्या मदतीबद्दल मंत्री विखे पाटील यांनी राज्यपाल महोदयांचे आभारही मानले.
या भागातील परिस्थिती आता निवळत असून, लष्कराने विविध ठिकाणांहून मार्गांची उपलब्धताही करुन दिल्याने हे सर्व भाविक सुखरुपपणे परतीच्या प्रवासासाठी निघाले असल्याबाबतही सांगण्यात आले. मंत्री विखे पाटील यासर्व प्रवासी भाविकांच्या संपर्कात सातत्याने आहेत.