युवकांनी देशबांधणीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा - डॉ. जयश्री थोरात
◻️ अमृतवाहिनीत ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
संगमनेर LIVE | अनेक स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारकांच्या योगदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आता पुढील पिढ्यांवर असून युवकांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग हा देशबांधणीसाठी व एकात्मतेसाठी करावा असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मेधा मैदानावर झालेल्या सामूहिक ध्वजारोहण डॉ. जयश्री थोरात व एवरेस्ट वीर सुविधा कडलग यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त सौ शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. विवेक धुमाळ, डॉ. एम. ए. वेंकटेश, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, सौ. जे. बी. शेट्टी, प्राचार्य शितल गायकवाड, अंजली कन्नावार, शोभा हजारे, रजिस्टर प्रा. विजय वाघे, नामदेव गायकवाड, कृषी महाविद्यालयाचे प्रा. बाचकर, जिमखाना विभाग प्रमुख बाळासाहेब शिंदे, डॉ. सुनील सांगळे आदिसह विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शुभेच्छा देताना कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याला मोठी त्यागाची व बलिदानाची परंपरा आहे. स्वातंत्र्याबरोबरच लोकशाही व राज्यघटना जपण्याची जबाबदारी आता प्रत्येकाची आहे. भारतीय युवकांनी जगात आपली उपयुक्तता सिद्ध केली असून शिक्षणाच्या माध्यमातून देश बांधणीसाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. गुणवत्तेमुळे संगमनेर हे शैक्षणिक हब झाले असून अमृतवाहिनी संस्थेचे नाव मोठे आहे. येथील युवकांना जागतिक पातळीवर मोठी मागणी असून प्रत्येकाने गुणवत्ता ठेवून अमृतवाहिनीचे व संगमनेरचे नाव जगभरात मोठे करावे असे आवाहनही त्यांनी केले.
सुविधा कडलग म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्था देशभरात पोहोचली असून गुणवत्ता हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. संगमनेर तालुका हा स्वातंत्र्य सैनिकांचा म्हणून ओळखला जात असून ही परंपरा जपताना प्रत्येकाने देश हितासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सुरक्षा अधिकारी नरेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा विभाग व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. जिमखाना विभाग प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.