◻️ पुरुषांमध्ये प्रवीण राऊत व महिलांमध्ये साक्षी हाडवळे प्रथम
संगमनेर LIVE (अकोले) | स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कॉम्रेड यादवराव नवले स्मृती मॅरेथॉन स्पर्धेला अकोले येथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्नेह वर्धिनी प्रतिष्ठान संचलीत यशतेज करियर अॅकॅडमी आयोजित पुरुषांसाठीच्या पाच किलोमीटर स्पर्धेत प्रविण राऊत, तर महिलांच्या तीन किलोमीटर स्पर्धेत कु. हाडवळे साक्षी यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.
अकोले येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. भाऊराव उघडे यांनी केले. अकोले तालुक्यातील गरीब, श्रमिकांच्या चळवळीत कॉ. यादवराव नवले यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या स्मृती स्मरणात राहाव्यात व तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यशतेज करियर अॅकॅडमीच्या माध्यमातून श्रमिक वर्गातील युवक व युवतींना पोलीस तथा सैन्य भरतीसाठी सहाय्य करण्याचे काम करत आहे. मागील वर्षी अॅकेडमीच्या माध्यमातून २४ विद्यर्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये यश प्राप्त केले आहे. पोलीस भरतीसाठी वेगाने व दीर्घकाळ धावण्याचे कौशल्य आवश्यक असते. तालुक्यातील विद्यार्थ्यांचे हे कौशल्य वृद्धिंगत व्हावे व क्रीडा क्षेत्रातही तालुक्यातील खेळाडूंना यश प्राप्त करण्यात प्रोत्साहन मिळावे यासाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
अकोले तालुक्यातील युवक व युवतींमध्ये पोलीस व सैन्य भरतीसाठी तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविण्याचे मोठे सामर्थ्य आहे. आदिवासी भागात हे कौशल्य विकसित करण्यासाठी सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध झाल्यास तालुक्यातील युवक व युवतींना आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मोठी मदत होईल. मॅरेथॉन स्पर्धेसारख्या उपक्रमांमुळे उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्वही अधोरेखित होईल असे प्रतिपादन डॉ. भाऊराव उघडे यांनी या प्रसंगी केले. महिलांमध्ये कु. हाडवळे साक्षी हिने प्रथम, होलगिर धनश्री दत्तू हिने द्वितीय व सायली घोमल हिने तृतीय क्रमांक पटकावला. पुरुषांमध्ये प्रविण राऊत याने प्रथम, संतोष गिऱ्हे याने द्वितीय, तर प्रशांत कोल्हे याने तृतीय क्रमांक पटकावला.
यशतेज करियर अॅकॅडमीचे संचालक एकनाथ सदगीर तसेच अविनाश आभाळे, गणपत धुमाळ, दत्तात्रेय घुले, नितीन शेजवळ यांनी स्पर्धा आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. डॉ. अजित नवले, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजणे, ज्ञानेश्वर काकड, शिव साबळे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्य केले.